Thursday, 2 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेत रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज विधानसभेत यासंदर्भात निवेदन देत होते. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि १५ दिवसात त्यांना मंजुरी मिळेल. नाले, बंधारे, शेततळी, गाव तळी यातून हे गौण खनिज घेता येईल, त्याची वाहतूक शेतकऱ्याच्या मालकीच्या ट्रॅक्टर किंवा बैल गाडीने करता येईल, या वाहतुकीसाठी कुठलाही दंड आकारला जाणार नाही असं बावनकुळे यांनी सांगितलं.

**

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगाने सुरू असून डिसेंबर २०२७ पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासंदर्भातल्या चर्चेत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या आठ ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्रं स्थापन करायचा निर्णय सरकारने घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

**

राज्यात विकसित भारत रोजगार आणि उपजिविका हमी ग्रामीण – व्हीबी जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी, राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. जुन्या योजनेतल्या काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील याची देखील आमदारांना माहिती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सात आरोपी अटकेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही, असं संयुक्त राष्ट्रांतले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश परवथानेनी यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक दहशतवादविरोधी धोरणाच्या नवव्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी एकजुटीने जागतिक पातळीवर कारवाई करण्याचं आवाहन भारताने या बैठकीत केलं. भारत अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी ठरत आला आहे. त्यामुळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा स्पष्ट शब्दांत निषेध झाला पाहिजे, अशी भारताची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या लोहारा इथं आज भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात तीन पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. यात कोणत्याही प्रकारचं नुकसान झानं नसल्याची माहिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  कक्षाच्या वतीने देण्यात आली.

****

नाशिक मधल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी १६ संशयित आरोपींविरुद्ध ११ हजार पानांचं प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. २०१४ पासून बोगस शिक्षक भरती दाखवून शासनाची १६० कोटींची फसवणूक झाली असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले असल्याची माहिती मुख्य तपास अधिकारी, नाशिकचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. एफआयरमधल्या ८२१ संशयितांची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई, ठाणे, पालघर, अहिल्यानगर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे, जिल्ह्याच्या पूर्व भागासह पश्चिम किनारपट्टी परिसरात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने होत आहे. ११ टीएमसी क्षमतेचं हे धरण २५ टक्के भरावाच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या अनेक भागांतही काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांची पाणीपातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

****

No comments:

Post a Comment