Thursday, 9 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 09 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ जुलै २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न इथं भारत-ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्ये दोन्ही देशांतल्या उद्योगपतींना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक भागीदारी, गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि भविष्यातल्या सहकार्याच्या संधींवर सविस्तर भाष्य केलं. ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन करत, दोन्ही देशांनी विकासाची नवी उंची गाठण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – डीआरडीओनं ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक नावाच्या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला ६० किलोमीटर इतका असून, त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत डीआरडीओचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'फिरता वारकरी दवाखाना' या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसंच शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांना प्राथमिक आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय मदत या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

****

परभणी, हिंगोली, लातूर आणि आसपासच्या काही भागात मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात रात्री दीड वाजताच्या सुमारास सलग दोन तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सहा इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर पहाटेपर्यंत आणखी काही सौम्य धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव होतं. नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं तसंच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे.

****

सातबारावर नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२४–२५ मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहायकाने सातबारावर नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचे क्षेत्र वाढवून दाखवत शासकीय मदत निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कृषी सहाय्यक एस. एस. संगमकर याने सहा लाख १५ हजार ७०० रुपयाचा शासकीय निधीचा अपहार केल्याचं याबाबतच्या तक्रारीत म्हटलं आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातल्या सात हजार ३२९ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी ही माहिती दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. किनोळा इथं गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा आणि तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.

****

राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर आज ओसरला आहे.

नाशिकमध्ये पावसाने काल दुपारपासून विश्रांती घेतली असून, गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ६९ टक्के, तर दारणा धरण ४९ टक्के भरलं आहे. नांदूर मध्यमेश्वर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. आज कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. नांदूर मध्यमेश्वर बेटावर काल २२ युवक अडकले होते, आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांची सुखरूप सुटका केली.

रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील ७१ पैकी २१ धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.

सांगली शहरासह जिल्ह्यासह अनेक भागात काल सायंकाळी जोरदार पाउस झाला. जिल्ह्यातल्या कृष्ण आणि वारणा नद्यां दुथडी भरून वाहात आहेत.

****

No comments:

Post a Comment