Friday, 10 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 10 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या वीजेच्या मागणीपैकी गेल्या महिन्यात ५० टक्क्यांहून अधिक मागणी हरीत ऊर्जेद्वारे पूर्ण झाल्याची माहिती, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज समाज माध्यमांवर दिली. या महिन्याच्या सहा तारखेला एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा ५० पूर्णांक दोन टक्के इतका होता. भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेची वाढती क्षमता आणि विश्वासार्हता याचं हे एक उत्तम उदाहरण असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी आज मेलबर्न क्रिकेट मैदानाचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. भारतात तंत्रज्ञानासोबतच खेळांचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी, 'खेलो इंडिया' ते ऑलिम्पिकच्या यजमानपदापर्यंत, भारताचा क्रिडा संकल्प मांडला. 'खेलो इंडिया'मुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबांतल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं असल्याचं ते म्हणाले. भारताकडे २०३० च्या राष्ट्रकुल खेळांचं यजमानपद असून, २०३६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

आगामी काळात 'बिग बॅश लीग'चा एक कार्यक्रम भारतात आयोजित केला जाईल, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी यावेळी केली. खेळ हा सीमा आणि संस्कृतींच्या पलीकडे जाऊन मैत्री दृढ करतो, असं ते म्हणाले. 'बिग बॅश लीग'च्या चेन्नईतल्या आयोजनावर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

****

राज्यातल्या ग्रामीण भागात दर पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत दिली. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहिती देखील मंत्र्यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश वानखडे यांनी उपस्थित केली होती.

**

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश करण्यात येणार असून, यात कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम दिली जाईल अशी माहितीही आबिटकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती. ग्रामीण भागातल्या लोकांना या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यांनी यावेळी दिली. सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचंही आबिटकर यांनी सांगितलं.

**

जल जीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे १८ हजार सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावामध्ये पाहणी करताना काही वाड्या–वस्त्यांना वगळण्यात आल्याने हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी ११ हजार प्रस्ताव मंजूर झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

****

रस्ते अपघातांमध्ये २१ टक्क्यांची घट नोंदवत यवतमाळ जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत यवतमाळ पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे अपघातांमध्ये १००, मृत्यूंमध्ये ५३ तर जखमींच्या संख्येत ९७ ने घट झाली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या कठोर कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे हे यश मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड शहरातील सुभाष रोडचं नामकरण संत मुक्ताई मार्ग असं करण्याचा निर्णय बीड नगर परिषदेनं घेतला आहे. उद्या संत मुक्ताई यांच्या पालखीच्या आगमन दिवशी आमदार विजयसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली तसंच संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या मार्गावर संत मुक्ताईची पालखी शहरात दोन दिवस मुक्कामी राहत असते, त्यामुळे या रस्त्याचं नामकरण करण्यात येणार असल्याचं नगर पालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षित ठेवण्यात आलेल्या डीएपी खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. सध्या जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलं. खत खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे तसंच अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकार्यांनी केलं आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडदरम्यान एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदाच महिलांचा कसोटी सामना होत आहे.

****

No comments:

Post a Comment