Friday, 10 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन

·      साखर कारखान्यांकडील थकबाकी शेतकऱ्यांना लवकर मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न, सहकारमंत्र्यांची माहिती

·      संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात दाखल

आणि

·      जायकवाडी धरणातला पाणीसाठा ३० टक्क्यांवर, मराठवाड्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

****

राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. या समितीने सहा महिन्यांत अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला, त्यावेळी खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभुराज देसाई यांनी केली.

**

राज्यातल्या ४८ साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्तभावाचे २९८ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल, असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. ऊसाला अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संतपीठाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून, तातडीच्या गरजांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. संस्थेने मागितलेल्या ३५ कोटी रुपयांच्या निधीबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असं ते म्हणाले.

**

परभणी जिल्ह्यातल्या धानोरा काळे तसंच वझूर इथं गोदावरी नदीवरील पुलांच्या कामासंदर्भातील उर्वरित कामं तसंच निधीबाबत आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असं मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितलं. भाजप आमदार अतुल भोसले यांच्या लक्षवेधीला ते काल विधानसभेत बोलत होते. दोन्ही पुलांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्र्यांनी यावेळी दिली.

****

टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं आहे. हरी ओम आणि पवन यादव अशी दोघांची नावं असून, तपासादरम्यान या दोघांचा पेपरफुटी प्रकरणातल्या आर्थिक व्यवहारांसोबतच सगळ्या प्रकरणी सक्रिय सहभाग असल्याचं निदर्शनास आलं.

****

नागपूर इथं ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं काल केंद्रीय परिवहन सचिव व्ही. उमाशंकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी पुनर्वापर, गतीशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

दरम्यान, ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक उद्या ११ आणि परवा १२ जुलै रोजी नागपूर इथं होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं काल ६८ आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकानं, खानावळी, प्रसाद विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांचे १०५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. आषाढी एकादशीच्या काळात भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली.

****

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी मार्गावर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून पादुकांचं दर्शन घेतलं. शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या पालख्या उद्या पुण्यातून पुढे प्रस्थान करतील.

**

शेगाव इथून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं. 'गण गण गणात बोते'चा जयघोष करत पालखीच्या स्वागतासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. परळीनंतर पालखीचा मुक्काम अंबाजोगाई आणि बोरीसावरगाव इथं असेल.

****

छत्रपती संभाजीनगरहून आज जवळपास ६० सायकलस्वार वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले. १० ते ७९ वर्षे वयोगटातले सायकलपटू, साडे तीनशे किलोमीटर अंतर अवघ्या दोन दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे यांनी दिली.

दरम्यान, जालन्याचे २५ वारकरी सायकलवरून पंढरपूरकडे रवाना झाले. भोकरदन आणि जाफराबाद इथल्या सायकलप्रेमींचा हा संघ दररोज १२० किलोमीटरचा प्रवास करत ११ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल.

****

हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल सकाळी पांगरा शिंदे आणि खापरखेडा या गावांना भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र १०५ घरांचं अंशत: नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अहवालानुसार या भूकंपाचं केंद्र हिंगोली परिसरात असून सर्व धक्क्यांची खोली १० किलोमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, या भूकंपाचे धक्के लातूर जिल्ह्यातल्या उदगीर पर्यंत जाणवले. या पार्श्वभूमीवर लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी काल संबंधित शासकीय यंत्रणांचा आढावा घेतला. या अनुषंगाने कोणत्याही अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावं, असे निर्देश बास्टेवाड यांनी दिले.

या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत, असं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथं नांदेड तुळजापूर बुटीबोरी या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा भाग ढासळल्याची घटना घडली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास वाहतूक सुरू असताना हा प्रकार घडला.

****

हिंगोली इथं काल राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी टुडी-इको तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात ९२ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १८ विद्यार्थ्यांची मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया शासकीय योजनेअंतर्गत ठाणे इथंल्या के आय एम एस रुग्णालयात करण्यात येणार आहेत.

****

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीतील वातानूकुलित कुपमध्ये अनधिकृतपणे सजावट केल्याप्रकरणी जालना इथले सजावटकार अजहर शेख यांच्याविरुद्ध जालना रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित बोगीचे तिकीट कलेक्टर गिरीश कुमार यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेची विभागीय स्तरावर चौकशी सुरू असून, त्यानुसार पुढील कारवाई होणार असल्याचं, रेल्वे पोलीस निरीक्षक पी. बी. इंगळे यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून, परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील क्षमतेपेक्षा कमी नोंदणी झालेल्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहेत. रिक्त जागांच्या प्रवेशासाठी ११ ते ३१ जुलै दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

****

लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचं सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध विशेष दंडात्मक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत काल पंचायत समिती कार्यालयात तपासणी केली असता, १४ कर्मचाऱ्यांकडून दोन हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेतल्या विविध कार्यालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तीन कर्मचाऱ्यांकडून ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

****

नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक झाल्याने पैठणच्या जायकवाडी धरणातला जिवंत पाणीसाठा ३० टक्क्यांच्यावर पोहोचला आहे. गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला असून, नागमठाण धरणातून मात्र ३० हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, राज्यात कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथा भागाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment