▼

Saturday, 11 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·       विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप;येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन

·      शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथील; अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना

·      माझं गाव-आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आजपासून कुटुंब नियोजन

आणि

·      लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव याला अटक

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. २२ जूनपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात ९७ हजार ७०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, तर महिला सक्षमीकरण विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक यासह विविध २१ विधेयकांना या अधिवेशनात विधीमंडळाने मंजुरी दिली. विधान परिषदेच्या उपसभापतींची निवडणूकही या अधिवेशन काळात पार पडली.

विधीमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन सात डिसेंबर २०२६ रोजी नागपुरात घेण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस करत असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर विधानसभा तसंच विधान परिषदेचं अधिवेशन संस्थगित झाल्याचं दोन्ही सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं

****

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी पन्नास हजार रुपयांची मर्यादा हटवून दोन लाखांपर्यंत लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. काल विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते. याशिवाय २०२५ पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांचा लाभ मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

प्रशासनात कृत्रीम बुद्धिमत्ता एआयचा वापर, स्मार्ट मीटर, खत पुरवठा, बोगस बियाणं, पोलिसांची घरं, यासह विविध विषयांवर विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात उपस्थित केलेल्या मुद्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या तपासाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले…

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचे सामाजिक आणि तांत्रिक लेखा परीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. या लेखा परीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळणार असल्याचं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.

****

गेल्यावर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील चौदशेहून अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्याचं नुकसान झालं. त्यातल्या ४५२ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. ४५२ पैकी २५८ कामे पूर्ण झाली असून १०९ काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली.या समितीचा महिनाभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर १५ दिवसांनी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं. सदस्य अंबादास दानवे यांनी यासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली, सध्या योजनेची ८३ पूर्णांक पाच टक्के कामं पूर्ण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली.

****

राज्य सरकारने या अधिवेशनातून नागरिकांची निराशा केल्याची टीका विरोधकांनी केली. पावसाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली.

****

विधान परिषदेतील पाच आमदारांचा कार्यकाळ येत्या सहा डिसेंबरला संपणार असल्यानं, त्यांना काल निरोप देण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे एक ,काँग्रेस दोन आणि एका अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

****

नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. एसआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचा तसंच अपहार झालेल्या निधीच्या वसुलीचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

****

महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी, या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल, असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले  जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

****

जातपडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र SC, ST, VJ, NT, OBC, SBC सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर झालं. विधानसभेने यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

****

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आज ११ जुलै ते १८ जुलै २०२६ दरम्यान कुटुंब नियोजन सप्ताह राबवण्यात येत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

हिंगोली जिल्ह्यातही कुटुंब नियोजन सप्ताह राबवण्यात येणार आहे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कुटुंब नियोजन शिबीरं, नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरं, महिला बचतगट सभा, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, तसंच आरोग्य मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे.

****

लातूर तालुक्यातील खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील कथित ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. आरोपी मोतीनगर परिसरातील आपल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर बाहेरून कुलूप लावून लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

****

दहशतवाद विरोधी पथकानं काल छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथून प्रत्येकी सहा जणांना ताब्यात घेतलं. धाराशिव तसंच बीड इथूनूही काही जणांना ताब्यात घेतलं असून, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्काच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याचं वृत्त आहे. 

****

धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या गणेगाव इथल्या वैशाली जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्या स्वरूपात असलेल्या शिवणकाम व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय शेती, पशुपालन, याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली, यातूनच त्यांनी लखपती दीदी होण्याचा मान पटकावला. आपल्या या वाटचालीबाबत वैशाली जाधव यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या..

बाईट- वैशाली जाधव

****

शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं भाविकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. आज ही पालखी केज तालुक्यातील बोरी सावरगावकडे प्रस्थान करत आहे. तर, पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण काल अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मिडसावंगी इथं पार पडलं. त्यानंतर पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली. दरम्यान, श्री ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्याहून पुढे प्रस्थान करतील. ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पादुकांचं काल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दर्शन घेतलं.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान महिला क्रिकेट कसोटी सामन्याला कालपासून लंडनमघ्ये लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद २८५ धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा, इंग्लंडच्या एक बाद २१ धावा झाल्या होत्या. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर महिलांचा क्रिकेट सामना प्रथमच होत आहे.

 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड पुरुष संघात आज अखेरचा टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामने जिंकून इंग्लंडने विजयी आघाडी घेतली आहे.

****

हवामान

राज्यात उद्या रविवारपासून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

****

 

No comments:

Post a Comment