Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ११ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर असून
आज ते न्युझीलंड इथं आहेत. गेल्या चाळीस वर्षात प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी न्यूझीलंडला
भेट दिली आहे. या भेटीत दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध
क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होत आहे. काही महत्वाच्या मुद्यांवर स्वाक्षऱ्या
झाल्याचं नुकत्याच सुरु झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं. दरम्यान, उभय देशांतील संबंध अधिक दृढ करण्यावर
भर दिला जात असल्याचं या वार्ताहर परिषदेत सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील
भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत.
****
देशाचा ९० टक्क्यांहून अधिक व्यापार समुद्री मार्गाने
होतो, त्यामुळं देशाच्या आर्थिक
प्रगतीसह ऊर्जा सुरक्षिततेसाठी सागरी सुरक्षा महत्वाची असल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री
राजनथ सिंह यांनी म्हटलं आहे. आज सकाळी केरळमधील विशाखापट्ट्नम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी
या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात राजनथसिंह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी
ते बोलत होते.
****
'माऊलीं'चा जयघोष करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुणे शहरातून मार्गस्थ
झाली; पालखी फातिमानगरच्या
पुढे रवाना झाली असून हडपसर आणि दिवे घाट पार करून पालखी संध्याकाळी सासवड इथं मुक्कामी
पोहोचेल.
****
नाशिकमधून ३०० सायकलपटूंनी काल पंढरपूरकडे प्रस्थान
केलं. यामध्ये १६ दृष्टिहीन सायकलपटूंसह इतर दिव्यांग सायकलपटूंचा समावेश आहे. या वारीत
दिव्यांग सायकलपटू सुनील पवार हे एका पायाने सायकल चालवत तर दुसरे दिव्यांग बहिरु मते
हे एका कृत्रिम पायाने सायकल चालवत सहभागी झाले आहेत.
****
दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून
पंढरपूरसाठी यंदा १५५ विशेष बसचं नियोजन करण्यात आलं आहे. विभाग नियंत्रक अनुजा दुसाने
यांनी ही माहिती दिली. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन काल संपलं. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सीआयडी आणि विमान दुर्घटना तपास विभागामार्फत
करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या विभागाचा अंतिम अहवाल
पुढील वर्षी जानेवारीत येणे अपेक्षित असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधान परिषदेचे हिवाळी
अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे.
****
धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काल मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचे निवेदन
दिले. या भेटीत त्यांनी कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा
देण्याची आणि भरीव निधी देण्याची मागणी केली. यासोबतच, पीकविम्याच्या निकषात बदल, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणं आणि श्री तुळजाभवानी
मंदिरात भाविकांना सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे, या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी त्यांनी
चर्चा केली.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील साई जतिन दूध
संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी, जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई
करण्यात आली.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद पोलिसांनी बोरद इथं
बंद असलेल्या एका जिंनिंग मिलवर छापा टाकून मोठा दारुसाठा तसंच तस्करीसाठी वापरली जाणारी
११ वाहनं जप्त केली. या कारवाईत सुमारे चार कोटी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून
संशयित तिघांना अटक करण्यात आली आहे.
****
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या
पावसामुळं विविध धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील
मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर तीन हजार २९ धरणांमध्ये
मिळून ४० हजार ८६५ दशांश ३५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो
एकूण उपयुक्त साठ्याच्या ४१ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे. महसूल विभागनिहाय पाहता
छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ २४ पूर्णांक ९८ शतांश टक्के पाणीसाठा नोंदवण्यात
आला आहे.
****
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती
दिली असून सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
लंडन इथल्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या
ऐतिहासिक महिला क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, आज इंग्लंडचा संघ पहिल्या डावात कालच्या
एक बाद २१ धावांवरून पुढे खेळणार आहे. काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा माईया
बाउचियर १७, तर कर्णधार हीथर नाईट
१ धावेवर खेळत होत्या. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात २८५ धावांचा सन्मानजनक धावसंख्या उभारली. भारताकडून स्मृती
मंधानाने सर्वाधिक ८३ धावा केल्या, तर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून
गोलंदाजीत सोफी एक्लेस्टनने तीन, तर मॅडी विलियर्स, इस्सी वोंग आणि लॉरेन फायलर यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
****
फिफा विश्वचषक स्पर्धेत स्पेनने बेल्जियमला २-१ ने हरवून
उपांत्य फेरीत प्रवेश केला. लॉस एंजेलिसमधील इंग्लेवुड इथं हा दुसरा उपांत्यपूर्व सामना
खेळवला गेला. यापूर्वी, पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोला २-० ने हरवून फ्रान्सने उपांत्य फेरीत
प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment