▼

Tuesday, 14 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      रामजन्मभूमी देणगी अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस

·      अर्बन चॅलेंज फंड अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा-मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      सासवड–जेजुरी मार्गावर दिंडीच्या ट्रकने दिलेल्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू

·      छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा सुमारे तीन कोटी रुपयांचा साठा जप्त

आणि

·      लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

****

अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला तसंच राममंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत,न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची, आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे.या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासपथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायलयाने सांगितलं आहे.

****

उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून, काल रात्री विशेष चौकशी पथकाने बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरु केली आहे.

****

शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक 'कामगार हित' जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत झालेल्या या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

****

राज्यात बंद असलेल्या सहा वसतीगृहांना गेली चार वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचा प्रकार, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक - कॅग च्या अहवालातून निदर्शनास आला आहे. यातली चार वसतिगृहे जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलडाणा जिल्ह्यात एकेक वसतिगृह असल्याचं अहवालात म्हटलं आहे. गेली चार वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या  सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना दीड कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिल गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. राज्यातल्या ४९ सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या पाच वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचंही कॅगने म्हटलं आहे. २०२० सालापर्यंत २०० वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट, पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही.

****

स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत जेएनयू आणि जंतरमंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई मिळावी, ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ते म्हणाले. येत्या २० जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.

****

टीईटी पेपर फुटी प्रकरणात अटक असलेल्या दोन आरोपींना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली असून, दोन मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.

****

पुणे जिल्ह्यात सासवड–जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे तीन वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चार वारकरी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबेडिग्रज गावच्या रहिवासी असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. वारकऱ्यांची सुरक्षा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना वारकऱ्याची काळजी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत, वारीमध्ये संपूर्ण सुरक्षा आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीने काल बीड जिल्ह्यात हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथ वंशजांना विना बैलाच्या गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. या वेळी शेकडो तरुण, भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर नाथ वंशजांचा सन्मान करण्यात आला.

****

संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल जेजुरी इथं दाखल झाली. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत, नागरीकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ काल वरवंड मुक्कामी होता.

****

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छत्रपती संभाजीनगर इथं दोन आस्थापनांवर धाड टाकून निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केला. बगाडिया ॲग्रो प्रॉडक्टस आणि बगाडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस प्रायवेट लिमिटेड असं या आस्थापनांचं नाव असून, या ठिकाणांहून पामतेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल, तसंच अज्ञात वनस्पती तेलाचा एकूण सुमारे एक लाख ९० हजार ६४३ किलो साठा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. गोदामातली अस्वच्छता, तेलावर घाणीचा तवंग, तसंच पॅकेजिंगची अस्वच्छ व्यवस्था, या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. सदर तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे आठ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात महाविद्यालयांच्या विविध प्रशासकीय तसंच शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत ते काल मार्गदर्शन करत होते. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचं आवाहनही कुलगुरू चासकर यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नशामुक्त छत्रपती संभाजीनगर अभियान तसंच बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर या पंधरवाड्याचं काल उद्धाटन झालं. ३१ जुलै पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं राबवण्यात येणार आहेत. 

****

क्रिकेट

लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघाला १८६ धावांतच सर्वबाद करून, कसोटी २७० धावांनी विजय मिळवला. स्नेह राणा हिने सर्वाधिक चार तर सायली सतघरे, क्रांती गौड, आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. भारताकडून दुसऱ्या डावात यस्तिका भाटिया हिने सर्वाधिक ११३ तर स्मृती मानधनाने ७० धावा केल्या. सामन्यात सात बळी घेणाऱ्या क्रांती गौड हिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

****

बीड इथं १६ जुलैपासून आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये १६ तारखेला १७ वर्षांखालील खेळाडूंचे तर १७ जुलैला १५ वर्षांखालील मुलांचे सामने होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली.

****

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जेनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment