Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १४ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे
खरीप हंगामावर परिणाम दिसून येत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आढाव्यानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीची गती
मंदावली असून, आधीच पेरणी झालेल्या
सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात या पिकांवर ओलाव्याअभावी ताण निर्माण झाला
आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातल्या
अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे. काही ठिकाणी बियाण्यांची उगवण अपुरी राहिल्याने दुबार पेरणीची वेळ येण्याची
भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता
कमी राहण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी पुढील आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी उपलब्ध ओलाव्याचं संवर्धन करावं, अनावश्यक मशागत टाळावी आणि स्थानिक
कृषी अधिकारी तसंच हवामान विभागाच्या सूचनांनुसार शेतीची कामं नियोजित करण्याचं आवाहन
कृषी विभागाने केलं आहे. तसंच जिल्हा प्रशासनाकडून पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात
येत असून, आवश्यकतेनुसार पंचनामे
आणि इतर उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्हा अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
असून, अनेक गावांमध्ये पिण्याच्या
पाण्याची टंचाई कायम आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना
राबवत १८२ विहिरी आणि बोअर अधिग्रहित करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू
ठेवला आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि उपलब्ध
जलस्रोतांचं संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री
पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत या योजनेत सहभागी होता
येईल. या अंतर्गत खरीप हंगामातल्या १४ अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग
घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रिस्टँक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्वे करणं बंधनकारक
आहे.
****
'नीट' युजी पुनर्परिक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांचे रेकॉर्डेड रिस्पॉन्स राष्ट्रीय
परिक्षा संस्था – एनटीएने प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा
वापर करून लॉग इन करू शकतात आणि
आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकता.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ – एसटी डेपोच्या
पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध
पद्धतीन कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परिवहन
विभागाच्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र
विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला
गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त
आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने राज्यातल्या
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान' आयोजित करण्यात येत आहे. पूर्वी हे
शिबिर २२, २५ किंवा २६ जुलै या
तीन दिवसांपैकी एका दिवशी आयोजित करण्याचं नियोजन होतं, मात्र आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची
मागणी लक्षात घेऊन आता २२ जुलै ते दोन ऑगस्ट २०२६ या कालावधीत कोणत्याही एका दिवशी
शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक नागरिकांना
महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ सुलभपणे मिळणार आहे. महसूल विभागाने
काल यासंदर्भातला शासननिर्णय जारी केला.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या
वर्धापन दिनानिमित्त बीड विभागात पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव
अधिक दृढ करण्यासाठी राज्यव्यापी वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे. वृक्षारोपणानंतर
रोपांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करून हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित
न ठेवता सातत्यपूर्ण पर्यावरण संरक्षणाचा संकल्प म्हणून राबवण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत आज बीड विभागीय कार्यालय, विभागातली आठ आगारे तसंच बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात
येत आहे.
****
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात
नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक कोटी चार हजार ४८२ रुपये किमतीचा गुटखा
आणि वाहने जप्त केली. या प्रकरणी सराईत गुटखा माफियासह तिघांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीवर यापूर्वी गुटखा तस्करीसह
गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत
****
No comments:
Post a Comment