Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १६ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी
उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात
आली असून, आजपासून हे नवे दर लागू
झाले. त्यानुसार डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर साडे १५ रुपये, तर विमान इंधनावरील निर्यात शुल्क
प्रति लिटर साडर १४ रुपये करण्यात आलं आहे. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात प्रति लिटर
अडीच रुपयांची कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, देशांतर्गत इंधन उत्पादन शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली
नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ओडिशात जगन्नाथ पूरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत
जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहिण सुभद्रा
आणि बंधु बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात.
नऊ दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. गुजरातमध्येही अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात
यात्रेला प्रारंभ होत असून, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मंगलाआरती केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाप्रभु जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासीयांच्या
सुख समृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा
एक तेजस्वी आविष्कार आहे, रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातील लोक अनेक पिढ्यांना प्रेरणा
दिली असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा
टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार, भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात
एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. २०२४
मध्ये लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे नअ लाख होती, २०२५ मध्ये ही संख्या घटून सहा लाख
७९ हजार इतकी झाली. देशातल्या ९५ टक्के बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे.
****
महाराष्ट्रातील शासकीय निविदा आणि खरेदी प्रक्रियेत
मोठ्या सुधारणा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या
बैठकीत ते काल बोलत होते. पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नाविन्यपूर्णतेला
चालना देण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात
आलं. या सुधारणांमुळे शासकीय खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक आणि परिणामकारक होण्यास
मदत होईल, तसंच नव्या उद्योगांना
आणि स्टार्टअप्सना शासनाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची अधिक संधी मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश
२०२६ मधल्या राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात
आला आहे. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातलं अधिकृत परिपत्रक जारी केलं. दिवंगत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह
राज्यातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाईल, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. हा आदेश राज्यातल्या सर्व
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला
आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी यशोदा
हायब्रीड सीड्स कंपनी विरोधात खामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी
या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी केली, मात्र बियाणे उगवलेच नाहीत. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी
हे बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. जिल्ह्यात बोगस बियाण्यांबाबत ८०० हून अधिक
तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई
केली.
****
धाराशिव शहरात आज सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला.
यामुळे खिडक्यांची तावदानं हादरली तसंच जमीनही कंप पावल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे
नागरिक भयभीत झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत
भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत तीन सुवर्ण आणि १० रौप्य पदकांची
कमाई केली. १९ वर्षाखालील ५१ किलो वजनी गटात भारताच्या चंद्रीका पुजारीनं आणि प्राचीनं
सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा श्योकंद आणि प्राची तोकस यांना
रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे २३ वर्षांखालील
५४ किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा ५-० असा एकतर्फी पराभव
करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली.
****
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनाने
इंग्लंडचा दोन-एक असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना
अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी १९ जुलै रोजी होईल.
****
No comments:
Post a Comment