▼

Friday, 17 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून सोनीपतदरम्यान धावणाऱ्या देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. हायड्रोजनवर चालणाऱ्या या रेल्वेगाडीच्या शुभारंभामुळे रेल्वेचा स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीचा स्वीकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. ही रेल्वेगाडी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली असून, प्रगत रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रात देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. जिंद-सोनीपत मार्गावर ही रेल्वेगाडी ताशी किमान ७५ ते कमाल ११० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे.

यानंतर जिंद इथं झालेल्या कार्यक्रमात १४ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

यानंतर पंतप्रधान चंदीगढ आणि पंजाबच्या दौर्यावर जाणार आहेत.

चंदीगड इथं चार हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली–अमृतसर–कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. देशातल्या ७५ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन यावेळी करण्यात येणार असून, यामध्ये राज्यातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

****

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने येत्या रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं, यासाठी या बैठकीदरम्यान सरकार सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मागणार आहे. हे पावसाळी अधिवेशन या महिन्याच्या २० तारखेपासून सुरू होणार असून, पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे कायदे चर्चा आणि मंजुरीसाठी घेतले जाण्याचं नियोजन आहे.

****

वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परिक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था – एनटीएनं जाहीर केला आहे. ११ लाख विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर वीस लाख विद्यार्थी या पुनर्परिक्षेला बसले होते.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत 'महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन'च्या संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली. राज्यातल्या कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार आणि संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महाकेअर अंतर्गत नागपूरमध्ये नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीची स्थापना करण्यास त्यांनी मान्यता दिली. यावेळी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलबरोबर तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

****

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी २२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यभर 'महा आरोग्य शिबिर' आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं, संलग्न रुग्णालयं तसंच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांचा सहभाग घेऊन, जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी व्यापक जनजागृतीचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधुने उपांत्य फेरी गाठली आहे. आज उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी होणार होता. मात्र, ओकुहाराने स्पर्धेतून माघार घेतल्याने सिंधूला वॉकओव्हर मिळाला आणि ती थेट उपांत्य फेरीत पोहोचली.

****

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरू असलेल्या १९ आणि २३ वर्षांखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई केली. २३ वर्षांखालील ५० किलो वजनी गटात विश्ननाथ याने जपानच्या खेळाडूचा 3-2 असा पराभव केला, तर गंगाने कझाकस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत सुवर्ण पदक जिंकलं. २३ वर्षाखालील ६५ किलो वजनी गटात वंशजने, १९ वर्षाखालील ५५ किलो वजनी गटात आदित्यने, तर ९० किलो वजनी गटात शुभम राजपूत यांनी रौप्य पदकं जिंकली.

****

अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे, पीजीआर, बायो उत्पादने आणि निकृष्ट खतांच्या विक्री विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं.

****

No comments:

Post a Comment