▼

Saturday, 18 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ; ७५ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

·      एसटी महामंडळाच्या सुमारे साडे १३ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता

·      ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससी कडून स्थगिती

·      मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला आठ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

·      छत्रपती संभाजीनगर नजिक अपघातांच्या दोन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

·      आणि

·      माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुल प्रसादाला प्रतिष्ठेचा जी आय टॅग

****

देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला. हरियाणात जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या चार देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीचा स्वीकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणारी ही रेल्वेगाडी, रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रात देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून करण्यात आली आहे. ३२०० अश्वशक्तीची ही हायड्रोजन रेल्वेगाडी १० डब्यांची असून त्यातून एकावेळी अडीच हजार प्रवासी प्रवास करू शकतात. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..

हरियाणात जिंद आणि सोनीपत स्थानकादरम्यान शून्य कार्बन उत्सर्जन असलेली देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे धावली, आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला. जिंद रेल्वेस्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतांना पंतप्रधान म्हणाले -

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ताशी ७५ ते कमाल ११० किलोमीटर वेगाने धावू शकणारी ही रेल्वेगाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेची माहिती देतानाच पंतप्रधानांसह देशवासियांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले -

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

अमृत भारत योजनेत देशातल्या ७५ पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंजाबात जालंधर इथे झालेल्या या समारंभात बोलतांना पंतप्रधानांनी, ही रेल्वे स्थानकं, आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवत असल्याचं सांगितलं. काल लोकार्पण झालेल्या या ७५ रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

बारामती रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा असल्याचं, उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केलं.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आगामी संसदीय अधिवेशनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारी २० तारखेपासून सुरू होऊन पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत चालणार आहे.

****

कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आभासी पद्धतीने मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असं महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही, मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या सुमारे साडे १३ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सदर निर्णयामुळे या पूर्वी केलेली साध्या बसेस ची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार आहे.

****

ओला, उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरापेक्षा अवास्तव दरकपात किंवा अतिरीक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं लागू केलं आहे, त्यात ही तरतूद आहे. या धोरणात खासगी वाहनांद्वारे कारपूलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला फक्त प्रवासाचा खर्च सहप्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पूलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना फक्त महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा - संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेसाठी आता ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि ३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन शुल्क भरता येईल. नव्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार आहे.

****

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला आठ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यात कोकण, मुंबई तसंच इतर काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या कामात आलेला व्यत्यय लक्षात घेता, केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मुदतवाढ दिली आहे. येत्या १९ ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्धी केल्या जाणार आहेत.

****

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्याने राज्यातल्या अव्वल आठ जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे.  जिल्ह्यातील १५ लाख ४१ हजार ७ मतदारांपैकी ८ लाख ६३ हजार ६०८ मतदारांच्या फॉर्मचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे. तर ८ लाख ६२ हजार ८८० फॉर्म बीएलओमार्फत पडताळणीसह प्राप्त झाले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर नजिक काल अपघातांच्या दोन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. सोलापूर धुळे महामार्गावर निपाणी इथे झालेल्या अपघातात परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील गुंज संस्थान शिवाश्रमचे अधिष्ठाता कालिदास महाराज बोरीकर यांच्यासह एका महिलेच निधन झालं. चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात घडला.

पुणे महामार्गावर भेंडाळा गावाजवळ झालेल्या अन्य एका अपघातात जालना जिल्ह्यातल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण अशी या तरुणांची नावं आहेत, हे दोघं दुचाकीवरुन पुण्याकडे जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील पानाचा विडा अर्थात तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा भौगोलिक मानांकन -जी आय टॅग मिळाला आहे. चेन्नई इथल्या जिओग्राफीकल इंडिकेशन्स्सच्या रजिस्ट्रीने याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांनी यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.

****

नांदेड इथं जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचं जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं.पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे.

दरम्यान, नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरच्या विष्णुपुरी इथल्या उड्डाण पुलाच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री सावे यांनी पाहणी केली. या घटनेची चौकशी सुरू असून,कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचं आढळल्यास दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असंही सावे यांनी स्पष्ट केलं.

****

हवामान

मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासह विदर्भात बहुतांश भागाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बीड तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल दमदार पावसाने हजेरी लावली

****

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment