▼

Friday, 24 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक-पंतप्रधानांची घोषणा

·      सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं २६ दिवसांपासूनचं उपोषण मागे

·      आंदोलकांवर कारवाईच्या निषेधात पुकारलेल्या बंदला विभागात संमिश्र प्रतिसाद

·      महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी-विजया रहाटकर यांचं प्रतिपादन

·      २३ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कालपासून स्कॉटलंडमध्ये प्रारंभ

आणि

·      पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

****

पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईसाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. पंतप्रधानांनी काल सामाजिक माध्यमावरच्या संदेशात, या संदर्भातल्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम रुप देण्यात येईल, आणि संसदेत हा कायदा संमत करून घेण्यात येईल, असं सांगितलं. ते म्हणाले..

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्वरित प्रभावाने एक जलदगती न्यायालय स्थापन केलं आहे.

दरम्यान, शिक्षणपद्धतीतल्या मूलभूत दोषांवर जलदगती न्यायालयं स्थापन करणं हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया कॉकरोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही या पक्षाने केली आहे.

**

या प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं, पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. चर्चेच्या माध्यमातूनच ही कोंडी फुटू शकते, असं डॉ सिंह यांनी नमूद केलं. यासाठी सरकारच्या वतीने आतापर्यंत आंदोलकांना चार वेळा चर्चेचा प्रस्ताव पाठवल्याचं, सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट- राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह

**

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं २६ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण काल मागे घेतलं. काल रात्री गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयात, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, वांगचुक यांना शुभेच्छा देत, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

**

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी कालही संसदेच्या दोन्ही सदनात केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्याने दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

**

नवी दिल्लीत सीजेपीनं संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

**

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. हजारे यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल, असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी २ तास मौनव्रत आंदोलनही केलं.

**

दरम्यान, या संदर्भात मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करुन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत १८ ते २२ जुलै दरम्यान झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून १३ प्राथमिक माहिती अहवाल दाखल असून ४०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

**

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या वतीने परवा २६ तारखेला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

 

**

दरम्यान, या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने काल बंद पुकारला होता, त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

छत्रपती संभाजीनगर इथं अनेक भागातली व्यापारी प्रतिष्ठानं बंद दिसून आली. लातूर शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. नांदेड इथेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. हिंगोली शहरासह, जिल्ह्यात अनेक भागात व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला. जालना जिल्ह्यात व्यापारी वर्ग आणि शैक्षणिक संस्थांनी बंद पाळला. परभणीतही बाजारपेठा बंद होत्या तर काही शाळांनी सुट्टी जाहीर केली होती.

**

महिलांची सुरक्षा सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या तक्रारीकडे संवेदनात्मक भूमिकेतून पाहिलं जावं, असं आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केलं आहे. काल पुण्यात यशदा इथं पाठलाग आणि सायबर पाठलाग प्रतिबंध विषयावरील जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पाठलाग आणि सायबर पाठलाग हा दंडनीय गुन्हा असून, महिलांनी या समस्येचा प्रतिकार करून वेळीच तक्रार दाखल करावी, असं रहाटकर यांनी सांगितलं.

****

आषाढी एकादशीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. काल संतांच्या पालख्या वाखरीत दाखल झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर इथलं रिंगण काल मोठ्या उत्साहात पार पडलं.

****

या वारीदरम्यान राबवलेल्या 'चरणसेवा' उपक्रमाचा आज समारोप होत आहे. यंदा या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, आणि नांदेडसह, राज्यभरात १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी चरणसेवा तसंच आरोग्यसेवा करण्यात आली. या उपक्रमात १६४ आरोग्य संस्था, ७ हजार ५३८ स्वयंसेवक, ११ हजार ३३१ डॉक्टर, तसंच वैद्यकीय विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी भागातली बांधकामं नियमित करून घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन, आपली बांधकामं नियमित करून घेण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे.

बाईट- विभागीय आयुक्त जी श्रीकांत

****

'विकसित भारत' या संकल्पनेच्या धर्तीवर 'विकसित हिंगोली' घडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, काम करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथे हिंगोली जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते.

****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं महिला बचत गटाच्या नऊ लाख रुपयांची बॅग काल चोरीस गेली. जाफराबाद रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाला आता गती देण्यात येत आहे. संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी पुनर्वसनासाठी पुढे येणाऱ्या कुटुंबांची माहिती गोळा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी इथे सामाजिक वनीकरणाच्या वतीनं आयोजित वन महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. या वन महोत्सवानिमित्त 'रोपे आपल्या दारी' या अभियानांतर्गत वृक्षारोपण करणाऱ्यांना रोपं पुरवली जाणार आहेत.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील १३३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्याची सूचना भोसले यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील पात्र आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.

****

झिम्बॉब्वे विरुद्धचा पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारताने सात गडी राखून जिंकला. काल झिम्बॉब्वेत हरारे इथं झालेल्या या सामन्यात यजमान संघाने प्रथम फलंदाजी करत, सात बाद १२५ धावा केल्या, भारतीय संघाने हे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात १४ व्या षटकांत साध्य केलं. तीन सामन्यांच्या मालिकेतले पुढचे दोन्ही सामने उद्या आणि परवा होणार आहेत.

****

२३ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना कालपासून प्रारंभ झाला. स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं झालेल्या नेत्रदीपक सोहळ्यात या स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटन समारंभात १२५ खेळाडूंच्या भारतीय पथकाचं नेतृत्व मीराबाई चानू आणि लवलिना बोरगोहेन यांनी केलं. या स्पर्धा दहा दिवस चालणार आहे.

****

हवामान 

नाशिक शहरासह जिल्ह्यात गोदावरीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात पूल पाण्याखाली जाऊन काही गावांचा संपर्क तुटला होता. सुरगाणा तालुक्यात एक ४२ वर्षीय इसम पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे.

****

No comments:

Post a Comment