▼

Saturday, 25 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना करत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक युवक-युवतीला आपली स्वप्ने पूर्ण करण्याची प्रेरणा आणि संधी मिळावी तसंच विकसित भारताचा प्रवास अधिक वेगाने पुढे जावा, अशी सदिच्छा व्यक्त करत विठूमाऊलीची कृपा महाराष्ट्र आणि देशावर सदैव राहो, असा मनोभाव मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या एका भाविकाला छातीत त्रास झाल्यानं, त्यांना राज्य शासनाच्या ‘एअर ॲम्ब्युलन्स’द्वारे तातडीनं सोलापूरला हलवून उपचार करण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्सचा असा वापर प्रथमच झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन या रुग्णाची भेट घेतली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक उपचारांचे निर्देश दिले. आपत्कालीन स्थितीत वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने या वर्षी ही विशेष हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात नीरा नदी खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे, वीर धरण पूर्णपणे भरले असून धऱणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भिमा नदीला मिळत असल्याने, आज दुपारी दोन वाजेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे भिमा नदीकाठच्या लोकांसह पंढरपूर शहर-परिसरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगरजवळील प्रति पंढरपूर इथं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा आणि अभिषेक केला. महाराष्ट्रातील बळीराजा सुखी, समृद्ध राहावा आणि त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये, अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठल चरणी केली. दरम्यान, विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची वाळूज इथं मोठी गर्दी झाली असून दर्शनासाठी ओघ वाढतच आहे.

****

बीड आणि परभणी जिल्ह्यातही आषाढी एकादशीनिमित्त विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध शाळांमध्येही आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात येत असून बालगोपाळांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली.

****

आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीचं श्री साईबाबा समाधी मंदीर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली; तर वाशीमच्या देवपेठ इथल्या श्री विठ्ठल मंदिरात विठुरायाचे मनमोहक रूप भव्य रांगोळीतून साकारण्यात आले आहे.

****

नीट परीक्षा पेपरफुटी, त्यावर विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणि दिल्लीत आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मुंबईत तिरंगा मार्च निघणार आहे. तिरंगा मार्च पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी असून तो कोणत्याही राजकीय पक्षाचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम नाही तसंच मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल आणि पक्षनेत्यांच्या समर्थनाच्या घोषणाही दिल्या जाणार नाहीत असं मोर्चापूर्वी राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. सरकारच्या भूमिकेचा निषेध आणि देशभरातील विद्यार्थ्यांना पाठिंबा व्यक्त करणाऱ्या घोषणाच दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केलं आहे.

****

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-टीईटी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात १२ संशयितांना अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे संपूर्ण पेपरफुटीशी संबंधित समुहाचा पर्दाफाश झाला; प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

****

सलग सहा दिवस मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आलेली श्री माता वैष्णोदेवी यात्रा आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्याच्या बोरगाव इथं आज सकाळी दहा वाजेपासून आतापर्यंत भूकंपाचे चार धक्के जाणवले आहेत. हे धक्के अत्यंत सौम्य असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहाणी झालेली नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी बोरगाव इथं दाखल झाल्याचे आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात येत्या साठ तास पावसाचा जोर राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यानं, तसंच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं त्याचा परीणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत आहे. मराठवाड्यातही आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

****

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. याउलट अकोला जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता वाढली आहे.

****

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या हंगामी अध्यक्षपदी बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झाली आहे.

****

No comments:

Post a Comment