▼

Monday, 27 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक, २०२६ आज लोकसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. या विधेयकावर सदनात विस्तृत चर्चा होईल, असं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. मात्र, नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवर सरकारने निवेदन देण्याची मागणी करत विरोधकांनी सदनात गदारोळ सुरु केला. हे विधेयक अत्यंत महत्वाचं असून, यामुळे परिक्षा पद्धतीत सकारात्मक बदल होतील, असं बिर्ला यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरुच राहील्यानं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. त्याआधी देखील १२ वाजेपर्यंत सदनाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पोलिस कारवाईवर सरकारने निवेदन देण्याची मागणी केली. यावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयकात, पेपरफुटीच्या आरोपींवर जलदगतीनं खटले चालवण्यासाठी प्रत्येक राज्यात जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची तरतूद आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्याची अपेक्षा असून, परीक्षांमधल्या गैरप्रकारांमध्ये सहभागी व्यक्तींना किमान ५ ते कमाल १० वर्षांची कारावासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड प्रस्तावित आहे. संघटित गुन्ह्यांच्या बाबतीत किमान सात वर्षांची शिक्षा आणि १० कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

****

दरम्यान, विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईच्या विरोधात दाखल याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या मारहाणीविरोधात दाखल केलेल्या वैयक्तिक याचिकांवरही सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती ज्यॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे.

****

माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. भौतिकशास्त्र आणि एअरोस्पेस अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या डॉ. कलाम यांनी तब्बल चार दशकं डीआरडीओ आणि इस्रो या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून त्यांनी देशभरात नावलौकिक मिळवला. २००२ मध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. कलाम यांना आदरांजली वाहत, ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून ते देशवासीयांसाठी कायम आदर्श राहतील, असं म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांना त्यांनी नवी उंची मिळवून दिली आणि त्यांची ही कामगिरी भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली असल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. २७ जुलै १९३९ रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील महत्त्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘सिल्क आणि मिल्क’ योजना तसंच ‘मेरा रेशीम मेरा अभियान’ यावर विशेष कार्यशाळा काल घेण्यात आली. रेशीम आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘सिल्क आणि मिल्क’ योजना राबवणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात लवकरच रेशीम प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. या कार्यशाळेला कुलगुरू डॉ. इंद्र मणी, जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

****

लातूर इथल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने १२ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेश शुल्कासाठी एक लाख ६१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. आज प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या हस्ते १२ विद्यार्थ्यांना या धनादेशाचं वाटप करण्यात आलं.

****

अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं या मागणीसाठी धाराशिव इथं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने उद्या २८ तारखेला महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप यावेळी उपस्थित असतील. समितीचे सदस्य धनंजय शिंगाडे आणि राजाभाऊ ओहाळ यांनी धाराशिव इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर मधून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातला पाणीसाठा ५६ टक्क्याच्या वर गेला आहे.

****

हवामान विभागाने आज छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथं उद्या आणि परवा २९ तारखेला, तर नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment