▼

Tuesday, 28 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज सलग सातव्या दिवशी बाधित झालं. राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

नीट प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत गोंधळ केला. सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी अनाहत सिंग, तेविसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पॅरा ॲथलीट शर्मिला धनकर हिच्यासह अन्य पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. परिक्षांमधल्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतच्या विधेयकावर गांभीऱ्यानं चर्चा करण्याचं आवाहन बिर्ला यांनी वारंवार करूनही विरोधकांचा गदारोळ न थांबल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. कामकाज सुरू झाल्यानंतर काही संसदीय समितींचे अहवाल पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी कामकाज सुरू करताच विरोधकांनी, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय समितीची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य नेते या बैठकीत सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेला गट, नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या खासदारांनीही या बैठकीत भाग घेतला. रालोआची संपूर्ण एकता प्रदर्शित करण्यासाठी संसद सत्रादरम्यान दर मंगळवारी मंगल मिलन नावाची ही बैठक आयोजित केली जाते.

****

गुरुपौर्णिमा उद्या साजरी होत आहे. यानिमित्त शिर्डी इथं उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर उत्सवानिमित्त प्रथम दिवशी साईबाबा समाधी मंदिरात मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सावित्री जगदाळे यांची एकूण सोळा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबा इथल्या थ्री स्टार लॉजवर उघडकीला आलेल्या बेकायदा गर्भलिंग चाचणी प्रकरणी करवीर पोलिसांनी मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील आणि लॉजचा मालक यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन महिलांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार आहेत. या ठिकाणी तीन महिलांची गर्भलिंग तपासणी झाल्याचं तपासात उघड झालं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस पडला नसला तरीही जिल्ह्यातल्या उजनी धरणात सध्या सुमारे सत्त्याण्णव टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं उजनी धरण भरलं असून, यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी या दिवशीपर्यंत वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के पाऊस झाला होता .सध्या संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी मध्यम प्रकल्पात ८० टक्के, खेड तालुक्यातल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पात ६७ टक्के, तर राजापूर तालुक्यातल्या अर्जुना मध्यम प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा आहे.

****

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली.अनेक भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू असल्यानं, खोळंबलेल्या शेती कामाला पुन्हा एकदा वेग आला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात कणकवली आणि वैभवववाडी तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

****

भंडारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे साकोली तालुक्यातल्या सुंदरी गावातल्या तलावाची भिंत खचल्यामुळे आजूबाजूच्या सुमारे वीस हेक़्टर शेतीचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. तलावाची तात्काळ दुरुस्ती करून झालेल्या नुकसानाची भरपाई सरकारनं द्यावी, अशी मागणी हे शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६१ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातल्या पेठवडज आणि बारुळ तर देगलूर तालुक्यातल्या देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. 

****

No comments:

Post a Comment