Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
आंतरराष्ट्रीय
व्याघ्र दिन आज साजरा करण्यात येत आहे. "स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी
ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भारत
हा जगातला सर्वाधिक वाघ असलेला देश असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार
देशात सुमारे तीन हजार ६८२ वाघ आहेत. जगातल्या ७० टक्क्यांहून अधिक वन्य वाघ भारतात
आढळतात. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र ही
वाघांच्या संख्येत आघाडीची राज्ये आहेत.
भारताच्या
व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये वन विभागातले कर्मचारी, वैज्ञानिक आणि संवर्धनवाद्यांच्या
अथक प्रयत्नांचा आणि समर्पणाचा महत्त्वाचा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. याच भावनेतून स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासोबतच मानव-वन्यजीव संघर्ष
कमी करण्यासाठी भारताची कटिबद्धता कायम असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात
नमूद केलं.
****
गुरुपौर्णिमा
आज साजरी होत आहे. आपल्या जीवनप्रवासात ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता
व्यक्त करण्याचा हा दिवस. यानिमित्त राज्यभरातल्या विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगाव मधील संत गजानन महाराज
मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यासह
राज्यभरातल्या सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा, काकड आरती, सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी
मोठी गर्दी केली आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारच्या सचिवांची दुसरी उच्चस्तरीय बैठक
काल पार पडली. या बैठकीत वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग तसंच तंत्रज्ञान या महत्त्वाच्या
क्षेत्रांतली प्रगती आणि भविष्यातल्या धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी
पंतप्रधानांनी तांत्रिक स्वावलंबनाला प्राधान्य देण्यावर भर देत, महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये
देशांतर्गत क्षमता विकसित करणं आणि स्वदेशी तंत्रज्ञान अधिक सक्षम बनवणं ही काळाची
गरज असल्याचं अधोरेखित केलं.
****
देशभरात
साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी केंद्र
सरकारने एक ऑगस्ट २०२६ पासून साखर व्यापाऱ्यांवर साठवणुकीच्या मर्यादेचे निर्बंध लागू
करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. साखरेची
साठेबाजी रोखणं, सट्टेबाजीला
आळा घालणं आणि ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश
आहे.
****
नीट
युजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने १३ आरोपींविरोधात दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र
दाखल केलं आहे. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक
आणि पुरावे नष्ट करणं यांसह विविध आरोप आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी सीबीआयने
पुणे आणि लातूरसह राजस्थान, हरियाणा
आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली होती. या आरोपींविरोधात सार्वजनिक परीक्षा
गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, सर्व आरोपी सध्या न्यायालयीन
कोठडीत आहेत.
****
पुढच्या
वर्षी त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल जिष्णू
देव वर्मा यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या
नियोजनबद्ध तयारीचे कौतुक केलं. काल नाशिक इथं झालेल्या बैठकीत राज्यपालांनी कुंभमेळ्यासाठी
सुरू असलेल्या विकासकामांचा आणि विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. कुंभमेळ्यादरम्यान
पावसाळ्याचा कालावधी असल्याने स्वच्छता, आरोग्य आणि भाविकांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्यावर, तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर त्यांनी
भर दिला.
दरम्यान, नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य
विज्ञान विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी दीक्षांत समारंभ काल राज्यपालांच्या उपस्थितीत
पार पडला. आरोग्य क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिक्षण, नैतिकता, सहानुभूती आणि समाजसेवेचा ध्यास
घ्यावा, असं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
राज्यातली
पाणी गुणवत्ता बाधित गावं आणि वाड्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण
सयंत्रांच्या देखभाल दुरुस्तीचं धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा
आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. जलस्तोत्रांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून
दोन टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
जालना
इथल्या वस्तू आणि सेवा राज्यकर सहआयुक्त सुवर्णा लोहिया आणि खाजगी कर सल्लागार अक्षय
जैन यांना ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली.
एका व्यावसायिकाचा इनपुट क्रेडीट टॅक्स अनब्लॉक करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली
होती.
****
No comments:
Post a Comment