▼

Thursday, 30 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. २७ जुलै अखेर ऊस वगळता १४४ पूर्णांक ३६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ११७ पूर्णांक ६९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून, भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक ४५ पूर्णांक १० लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस ३६ पूर्णांक ५० लाख हेक्टर, मका ११ पूर्णांक ४३ लाख हेक्टर आणि तूरीची १० पूर्णांक ६७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

दरम्यान, एक जून ते २७ जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला होता.

****

मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. देशाला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी चळवळ उभी राहणं आवश्यक असून, अंमली पदार्थाची परिसंस्था नष्ट करावी लागेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत नशामुक्त भारत घडवण्याचा संकल्प केला.

****

राज्य शासनाने विनाअनुमती मुख्यालय सोडणाऱ्या तसंच अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केलं. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने कार्यालयातून किंवा मुख्यालयातून बाहेर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक आहे. सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या काही कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणं, उशिरा येणं, तसंच पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणं अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्याने शासनाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणं किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणं ही अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिस कारवाईच्या विरोधात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. आज सकाळी सदनाचं कामकाज सुरु झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, राष्ट्रकूल स्पर्धेत पदक पटकावणार्या खेळाडुंचं अभिनंदन केलं.

त्यानंतर, जेव्हा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी केली. सभागृहातल्या कामकाजादरम्यान आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीतही, सर्व खासदारांना प्रश्नोत्तराचा तास सुरळीत होऊ देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं, सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणं हे संसदीय परंपरेला अनुसरुन नसल्याचं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहील्याचं कामकाज स्थगित झालं.

****

क्रिकेटपटू अजिंक्य राहणे याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. समाजमाध्यमावरच्या संदेशातून त्याने ही माहिती दिली. अजिंक्यने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २०२३ मध्ये वेस्ट इंडिज दौर्यात, तर शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याने आपल्या कारकिर्दित एकूण ८५ कसोटी सामने, ९० एकदिवसीय सामने आणि २० टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत.

****

जागतिक कनिष्ठ स्क्वॅश सांघिक विजेतेपदाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने प्रवेश केला आहे. कॅनडातल्या ऑंटेरिओ इथं भारतीय पुरुष संघाने इंग्लंडचा २-१ असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना आता अमेरिकेशी होईल. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेकडून १-२ असा पराभूत झाला.

****

राज्यातल्या अनेक भागात आज पाऊस सुरु आहे.

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्याने १० प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या होत्या, तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या ४९ जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुखरुप बाहेर काढलं.

भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून एक लाख ३५ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment