Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार
पावसामुळे धरणांतल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, राज्यातल्या तीन हजार २९ धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा
६५ पूर्णांक २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३८ पूर्णांक ९६
टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या २४ तासात
६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या २४ हजार २३४ दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी ७४ पूर्णांक ३१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागातही रात्रभरापासून
पावसाची संततधार सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र जोरदार
पाऊस सुरु आहे. पहिल्यांदाच या पावसाळ्यात कयाधू नदीला पूर आला असून, कळमनुरी-बोल्डा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांत काल रात्री मुसळधार
पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४३ पूर्णांक नऊ
मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सहा महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
**
धुळे जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय
घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी
भाग्यश्री विसपुते यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात
आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन
विस्कळीत झालं आहे. शेगाव शहरात भिंत कोसळून एला महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक
रस्ते, शाळा आणि घरांमध्ये
पाणी शिरलं आहे.
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात दहेली गावाजवळील अडाण नदीत
एक चारचाकी वाहून गेली. या कार मधले अविनाश खंडारे झाडाचा आधार घेऊन बचावले मात्र त्यांची
पत्नी आणि दोन मुलींचा शोध लागलेला नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी ताबडतोब मदत
कार्य सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर धरण पाणलोट
क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे
धरणातून तापी नदीपात्रामध्ये एक लाख ८५ हजार ८२८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू
आहे.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातल्या गंगाराम
वाडी परिसरात चार मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकल्याची शक्यता
व्यक्त करण्यात येत असून, बचावकार्य सुरु
आहे.
****
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान
झालेली पोलिस कारवाई आणि इतर मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं
कामकाज सोमवार तीन ऑगस्ट पर्यंत तहकूब झालं.
राज्यसभेत आजचं कामकाज सुरू झाल्यावर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी
सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे सादर केली. ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय
स्थायी समितीचा अहवालही यावेळी सादर करण्यात आला. त्यानंतर, सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी शून्यकाळ सुरु करताच
अनेक सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी
घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत
स्थगित झालं.
लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यावर नीट प्रकरणावरुन विरोधकांनी
घोषणाबाजी करत गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी लाऊन धरली. या गदारोळातच
जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक २०२६ सदनानं पारित केलं. त्यानंतरही घोषणाबाजी सुरुच
राहील्यानं लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं.
****
महिला आणि बालकांसाठीच्या महत्वपूर्ण मदतवाहिनीसाठी नागरिकांनी
मिशन शक्ती ॲप डाउनलोड करावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा
देवी यांनी केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून महिला तसंच बालकांसाठी असलेल्या अनेक आपत्कालीन
तसंच सहाय्यक सेवा आणि सुविधा जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा
पवार यांच्या हस्ते आज बीड इथल्या ऐतिहासिक कनकालेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामांचं
भूमिपूजन झालं. यावेळी त्यांनी कनकालेश्वराचं दर्शन घेऊन विधीवत पूजा केली आणि जिल्ह्याच्या
प्रगती तसंच समृद्धीसाठी प्रार्थना केली. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड जिल्हा रुग्णालयात
भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
****
No comments:
Post a Comment