▼

Tuesday, 21 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे आजही ठप्प

·      प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सहभागींविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार

·      देशात ‘डेंग्यू’ प्रतिबंधासाठी ‘कुडेंगा’ या लसीच्या विक्रीला परवानगी

·      राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांत प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

आणि

·      शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील

****

नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज प्रथम तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहात शून्यप्रहर आणि प्रश्नोत्तराचा तासही होऊ शकला नाही. 

लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तास पुकारताच, काँग्रेससह अन्य विरोध पक्षांच्या नेत्यांनी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल, असं आश्वासन अध्यक्षांनी दिल्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी १२, त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.

 

राज्यसभेत सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खर्गे यांनी आभार मानत विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीमार प्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यानंतर गदारोळ सुरू झाल्याने सभापतींनी सदनाचं कामकाज प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.

****

काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर या प्रकरणी धरणे आंदोलन करण्यात आलं.

****

भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाच्या  बैठकीत पंतप्रधान बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असंही पंतप्रधानांनी सांगिल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले –

बाईट - संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू

****

संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सकारात्मक भूमिका बजावेल, विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजात सहकार्य करावं, असं आवाहन रिजीजू यांनी केलं. संसदेचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठीचं धोरण तसंच विविध संसदीय विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

दरम्यान, भारताने विविध देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांचाही मोदी यांनी बैठकीत उल्लेख केला. या मुक्त व्यापार करारात शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं, रिजीजू यांनी सांगितलं, ते म्हणाले -

बाईट - संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू

****

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सहा बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली तसंच यावर उद्या सुनावणी घेण्याची विनंती केली.

****

डासांमुळे उद्भवणाऱ्या ‘डेंग्यू’ या आजारावरच्या ‘कुडेंगा’ या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने परवानगी दिली आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून, ४ ते ६० वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह ४२ देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे.

****

मध्य प्रदेश विधानसभेने आज ‘समान नागरी संहिता-UCC विधेयक’ मंजूर केलं. सभागृहातील गोंधळ आणि विरोधी पक्षांचा तीव्र विरोध यांच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक मंजूर करण्यात आलं. या कायद्याच्या प्रमुख तरतुदींनुसार, राज्यात बहुपत्नीत्वाला मान्यता दिली जाणार नाही आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेचे कायदेशीर नियमन केलं जाईल. वारसा हक्काबाबत स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार असतील. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ची नोंदणी एका महिन्याच्या आत करणे अनिवार्य असेल. आदिवासी समुदायाला मात्र या तरतुदींमधून वगळण्यात आलं आहे.

****

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या मध्ये धाराशिव, हिंगोली, जालना, बीड, आणि परभणी यासह १० जिल्ह्यांतल्या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना या वर्षासाठी पाच कोटी रुपये निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार स्वरूपात अनुकमे १० कोटी, आठ कोटी, सहा कोटी, चार कोटी आणि दोन कोटी रुपयांचे एक ते पाच पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय सर्व क्षेत्रातील एकत्रित कामगिरीच्या आधारे प्रत्येकी २१ कोटी, १५ कोटी आणि ११ कोटी रुपयांचे तीन पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या तालुक्यांच्या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा संनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील.

****

लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. लोकायुक्त तसंच उप लोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे.

****

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या जाहीर व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एका छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्धाटनानंतर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय- घाटीच्या परिसरात सुसज्ज सात मजली धर्मशाळा उभारण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्त्वावर राबवला जाणार आहे. राज्यातील एकूण सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत.

****

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला २० टक्के आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालना इथं आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार विशेष पुनरीक्षण प्रक्रियेचा आमदार धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी पात्र नागरिकांची नावं यादीत समाविष्ट करण्यासह अपात्र नावं वगळण्याची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. ३१ जुलैपर्यंत पुनरीक्षणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुंडे यांनी प्रशासनाला दिले.

****

लातूर इथल्या विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने कातपूर इथं जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत आज जनजागृती करण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्वेंटीवन ॲग्री लिमिटेडच्या संचालक अदिती देशमुख यांच्या पुढाकारातून हा जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना कौशल्यावर आधारित विविध प्रशिक्षण देण्यात येत आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज बालविवाह निर्मूलन आणि नशामुक्त अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. शहरासह जिल्हाभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभियान ३१ जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment