▼

Sunday, 2 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

विकसित भारतासाठी युवक शारीरिक दृष्ट्या निरोगी, मानसिक दृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं गरजेचं असून युवकांनी नेहमी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जिवनशैलीचा अंगीकार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत देशासाठी ‘नशामुक्त युवक संकल्प अभियाना’चा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आला. आज सकाळी साडेअकरा वाजता दृकश्राव्य संवाद माध्यमाद्वारे मोदी यांनी नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला.

काही उद्दिष्टे एकट्याने साध्य करणे कठीण असते, परंतु जेव्हा ती जनचळवळ बनते, तेव्हा ती लाखो लोकांना एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. आज देशभरातील लाखो तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि आपल्या शाळा, महाविद्यालये तसंच समाजात ‘अंमली पदार्थ-मुक्त भारत’चा संदेश पोहोचवण्याचा संकल्प केला आहे, असं यावेळी ते म्हणाले.

नशा-मुक्तिसाठी पुढचे शंभर आठवडे ‘जन-भागीदारी’ अभियान सुरू होत असून देशभरात प्रत्येक रविवारी साप्ताहिक कार्यक्रम होणार असल्याचं ते म्हणाले. या अभियानांतर्गत, २८ हजार ठिकाणी एक कोटींहून जास्त युवक सहभाग नोंदवणार आहेत. यात माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसोबतच शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, युवकांच्या संस्था, बिगर-सरकारी संघटनं आणि आध्यात्मिक संघटनांसुद्धा सहभागी होणार आहेत.

नवी दिल्लीत केंद्रीय युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया ‘संडे ऑन साइकिल’ अर्थात सायकलवरील रविवार या उपक्रमाच्या ८४ व्या भागात सहभागी झाले. यात विद्यार्थी, तंदुरुस्ती प्रेमी नागरीक, सायकलस्वार, तसंच एनसीसीचे युवा कॅडेट यांनी ‘नशा मुक्त भारत’ अभियानाच्या समर्थनार्थ सहभाग नोंदवला.

****

पैठणच्या जायकवाडीतील धरणात सध्या ८३ पूर्णांक ३९ टक्के पाणीसाठा आहे. यात जिवंत पाणीसाठा एक हजार, ८१० पूर्णांक ३६१ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा असून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत प्रकल्पात ४६ हजार, ६१७ घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. सध्या प्रकल्पात येणारी आवक पाहता आणि ही आवक वाढण्याची शक्यता असल्याने जायकवाडी धरणाची दारं कोणत्याही क्षणी उघडण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

नांदेड शहरातला विष्णूपुरी प्रकल्पात ९२ टक्के जलसाठा झाला असून कोणत्याही क्षणी आता प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातले काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. यवतमाळमधलं निळोणा धरणही ओसंडून वाहू लागलं आहे.

****

दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

आजचा दिवस मैत्री दिन अर्थातच फ्रेंडशीप डे म्हणून साजरा केला जातो. देशात प्रत्येकवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याचा प्रघात आहे. यानिमित्त आज सामाजिक माध्यमांवरून शुभेच्छा संदेशांचं आदान-प्रदान तसंच विशेष कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण’ लागू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या धोरणाअंतर्गत चार डिजिटल ॲप्स विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेचं अचूक स्थान, उपलब्धता, प्रतिसाद वेळ, अंदाजे भाडे आणि चलचित्राद्वारे प्राथमिक मार्गदर्शन मिळेल. तसंच दरपत्रक जाहीर करणे बंधनकारक करून मनमानीला आळा घालण्यात येणार आहे.

****

पंतप्रधान पीकविमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी येत्या दहा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी काल ही माहिती दिली.

****

महाराष्ट्र आणि कोकण भागातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ५१० किलोमीटर अंतर व्यापणाऱ्या या नव्या सेवेमुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यान जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार आहे.

****

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला एकेरीचं अजिंक्यपद भारताच्या तन्वी शर्मानं पटकावलं आहे. तैवानच्या तैपेई इथं आयोजित या स्पर्धेत आज सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वीनं व्हिएतनामच्या नएंगुयेन थुय लिन्ह विरुद्ध सरळ दोन सेट २१-१६,२१-१६ अशी सरस कामगिरी करत हे यश मिळवलं.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या उन्नती शर्मा हिने ज्युदो क्रीडा प्रकारात ६३ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.

****

No comments:

Post a Comment