▼

Tuesday, 4 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

देशातल्या महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील यांचं आज कोल्हापूरमध्ये निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. त्यांना महाराष्ट्रात शिक्षणमहर्षी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलं. डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांची भारताच्या विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. २००९ ते २०१३ या काळात ते त्रिपुराचे, तर २०१३ ते २०१४ या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. तसंच काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला.

डी वाय पाटील यांनी १९८३ मध्ये नवी मुंबईत 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी' या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज त्यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तीन हून अधिक अभिमत विद्यापीठे, सहा खाजगी विद्यापीठे आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत.

शिक्षण आणि समाजसेवेतल्या त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, महाराष्ट्रानं एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि मार्गदर्शक गमावला असल्याची भावना व्यक्त केली आहे.

****

नीटप्रकरणी झालेल्या आंदोलनातल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईच्या मुद्द्यासह अन्य काही मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही होऊ शकलं नाही.

लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, अशी मागणी केली. या प्रश्नावरून प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज बाधित करू नये, अशी विनंती अध्यक्षांनी केली, मात्र त्यांचा गदारोळ न थांबल्याने सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेचं कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अयोध्या मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर, विरोधी पक्ष या मुद्द्यावर देशाची दिशाभूल करत असून, राम मंदिराला विरोध करणारे पक्ष आता याबाबत नक्राश्रू ढाळत असल्याची टीका केली. सदनाचं नियमित कामकाज न चालू देता विरोधी पक्षांनी हौद्यापर्यंत जाऊन, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं, अशी मागणी करत गदारोळ केल्यामुळे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय समितीची साप्ताहिक मंगल मिलन बैठक आज संसद भवनात पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्यासह अन्य नेत्यांनी या बैठकीत भाग घेतला. तृणमूल काँग्रेसमधून वेगळा झालेला, नॅशनॅलिस्ट सिटिझेन्स पार्टी ऑफ इंडिया, हा गटही या बैठकीत सहभागी झाला होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची संपूर्ण एकता प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं या बैठका संसद सत्रादरम्यान दर मंगळवारी आयोजित केल्या जातात.

****

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून दक्षिण कोरियाच्या आसन इथं सुरू होत आहे. महिला एकेरीमध्ये तन्वी शर्मा भारताची सुरुवात करेल. मालविका बनसोड, अनमोल खरब, ईशरानी बरुआ, आकर्षी कश्यप, अश्मिता चालिहा, तान्या हेमंथ, मानसी सिंह, रक्षिता रामराज आणि श्रीयांशी वलीशेट्टी या खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत भारतीय चमूचं नेतृत्व करेल. त्याच्यासोबत किरण जॉर्ज, मिथुन मंजूनाथ, थारुन मन्नेपल्ली, रौनक चौहान आणि सनेथ दयानंद  संघात आहेत. महिला, पुरुष आणि मिश्र दुहेरीतही भारतीय जोड्या खेळणार आहेत. पुरुष दुहेरीची भारताची अग्रमानांकित जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्पर्धेत खेळणार नाही.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे २८ हजार १७३ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणी पातळी सुमारे ९० टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ११००, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment