▼

Monday, 10 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 10 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांमध्ये आज अनेक महत्त्वाची विधेयकं सादर होणार असून, त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभेत आज न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, २०२६, खाण आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक, २०२६, केरळ नाव बदल विधेयक, २०२६ आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, २०२६ ही चार विधेयकं सादर केली जाणार आहेत. न्यायाधिकरणांच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवाशर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणण्याचा उद्देश न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाचा आहे. तर केरळ राज्याच्या नावातील बदलाशी संबंधित विधेयकही लोकसभेत मांडलं जाणार आहे.

राज्यसभेत बँकर्स लेजर एव्हिडन्स बिल, २०२६ आणि करआकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक, २०२६ चर्चेसाठी सूचीबद्ध आहेत. बँकिंग क्षेत्रातल्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल नोंदींना कायदेशीर पुराव्याचा दर्जा देण्यासाठी या विधेयकात तरतुदी करण्यात आल्या आहेत.

प्राप्तिकर कायदा आणि वित्त कायद्यात सुधारणा करून देशाची करप्रणाली आणि वित्तीय नियामक व्यवस्था अधिक सुलभ, आधुनिक आणि कार्यक्षम करण्याचा करआकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकाचा उद्देश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ अभियानाला व्यापक जनआंदोलनाचं स्वरूप देण्याचं आवाहन क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात झालेल्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. तरुणांची ऊर्जा व्यसनाधीनतेत न जाता राष्ट्र उभारणीसाठी आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी वापरली गेली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. नशामुक्ती अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहनही खडसे यांनी केलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार असून, याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पंतप्रधान हे कुठल्या एकट्या पक्षाचे नसतात, विरोधकही त्यांना आपल्या विकास कामासाठी भेटू शकतात, असं ते म्हणाले. परकीय योगदान नियमन कायदा एफसीआरए हा कुठल्या विशिष्ट धर्माविरोधात नसून केंद्र सरकारने परकीय निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि याचा वापर देश विरोधी कृत्यांसाठी होऊ नये म्हणून संसदेत हे विधेयक आणल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यातल्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, यावर्षाअखेर हे प्रमाण ९० टक्के, तर पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथं शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. कागल नगरपरिषदेच्या वतीनं हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचं लोकार्पण, तसंच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

****

नाशिक-पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे-नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रस्ताविक मार्गानेच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे.

****

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने काल महामोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.

****

अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गादायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैद्राबाद इथून ताब्यात घेतलं. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

एफआयएसयु वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताने रौप्यपदक जिंकलं. मुंबईत सोमय्या विद्यापीठात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना हाँगकाँग सोबत झाला.

****

No comments:

Post a Comment