▼

Thursday, 20 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      गेल्या पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाची आजपासून मोहीम

·      राज्यात एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ, २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

आणि

·      पुढील दोन दिवसात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता, परभणी, बीड आणि नांदेड जिल्यांना आज पावसाचा यलो अलर्ट

****

राज्यात मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसर्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करून, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मृद आणि जलसंधारण व्यवस्थापनाबाबतच्या बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी राज्यातली जलसंधारणाची कामं, जलस्रोतांचं बळकटीकरण तसंच विविध विभागांच्या समन्वयातून जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

****

नशा मुक्त महाराष्ट्र धोरण सादरीकरणाबाबतही काल फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं, तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीने या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

राज्यातल्या ७० हजार सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मानीव अभिहस्तांतरणाचा प्रलंबित मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोसायट्यांच्या स्वयं-पुनर्विकास आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर त्वरित धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता इमारतीच्या जमिनीचे सातबारा आणि मालमत्ता पत्रकावर थेट सोसायटीचं नाव नोंदवलं जाणं शक्य होणार आहे. या सुधारित धोरणात भूखंड वाटपासाठी पारदर्शक पद्धतीनं लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार नवीन उत्पन्न मर्यादा लागू करण्यात येणार असून, शासकीय कर्मचारी, पत्रकार, कलाकार, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना शासकीय भूखंड मिळण्याचा मार्ग या नव्या धोरणामुळे मोकळा झाला आहे.

****

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग आजपासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला एका महिन्याची नोटीस दिली जाईल, त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता २४ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे २९ ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि चार नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

****

राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी  करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. 

****

राष्ट्रीय चाचणी संस्था – एनटीएच्या संस्थात्मक पुनर्रचनेची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्रं, मजबूत सायबर सुरक्षा व्यवस्था आणि संस्थात्मक तज्ज्ञांची यंत्रणा एकत्रित करण्याची गरज असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिकांवर काल सुनावणी झाली. यासंदर्भात नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलेकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले आहेत.

****

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत नीती आयोगाने ठरवून दिल्यानुसार राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमांमुळे या जिल्ह्यांमध्ये बदल होत असून, यात पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी केलं. केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रम पत्रकार अभ्यास दौऱ्यात ते बोलत होते. राज्यातल्या धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या आकांक्षित जिल्ह्यातले पत्रकार या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘शाश्वत नागरी प्रशासनासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावरील प्रादेशिक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते काल झालं. मुंबईच्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि शाश्वत करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्याची सूचना आयुक्त येडगे यांनी यावेळी केली.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातल्या डॉ. सुरेंद्र गट्टानी, स्वप्नील पाटील आणि प्रदीप निरभवणे यांनी, क्षयरोगावरील कमी पाण्यात विरघळणाऱ्या औषधांच्या प्रभावी वितरणासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण नॅनो - स्ट्रक्चर्ड ड्रग डिलिव्हरी तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राप्त झालं आहे. पेटंटचा कालावधी २० वर्षांचा असून, या तंत्रज्ञानामुळे औषधांची प्रभावीपणे शरीरात पोहोच वाढवण्यास तसंच त्यांच्या उपचारात्मक परिणामकारकतेत सुधारणेची शक्यता निर्माण झाली आहे.

****

गंगापूर नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाली. या योजनेला तातडीने गती देण्यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.

****

विश्व मानवता दिनानिमित्त बीड इथल्या के. एस. के. महाविद्यालयातून ‘मानवता यात्रा’ आणि ‘युवा संवाद परिषदे’ला काल प्रारंभ झाला. याअंतर्गत येत्या दोन ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये युवकांशी संवाद साधला जाणार आहे. स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण, वंचितांचे प्रश्न, व्यसनाधीनता आणि बेरोजगारी याबाबत युवकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

****

मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभाग समितीची बैठक काल पार पडली. या बैठकीस धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठवाड्यातल्या रेल्वे सुविधांच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबतच्या मागण्या मांडल्या. धाराशिव–तुळजापूर–सोलापूर तसंच धाराशिव– छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची सद्यस्थिती स्पष्ट करून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यात यावी, लातूर–औसा–उमरगा–कलबुर्गी नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देण्यात यावी, लातूर–पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

****

मृद आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या २१ तारखेला छत्रपती संभाजीनगर शहरात ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला काल प्रथमच चार हजार ५०० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. दोन्ही बाजार समित्यांमध्ये यंदा सुमारे १७ लाख ३१ हजार १६६ क्विंटल कांद्याची खरेदी झाली आहे. पिकांना जास्तीत-जास्त भाव कसा मिळेल यासाठी बाजार समितीचे संचालक प्रयत्नरत असल्याचं गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अर्चना सुकासे यांनी सांगितलं.

****

धाराशिव जिल्ह्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने प्रत्येकी पाच एकर जागेवर नवीन देवराया विकसित करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी पाच नामांकित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. प्रत्येक देवराईमध्ये सुमारे दोन हजार ५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, त्यांचं पाच वर्षे संगोपन केलं जाणार आहे.

****

नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ५-३ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारतानं स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला असून, पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ३७२ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेनं काल दुसऱ्या डावात ४ बाद ८४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, नवोदित मानव सुतारच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव कोसळला. मानव सुतारनं दुसऱ्या डावात सहा गडी, तर दोन्ही डावांत मिळून १० गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली.

****

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

****

 

 

No comments:

Post a Comment