▼

Monday, 24 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित, उपलब्ध आरोग्यसेवांची नागरिकांना माहिती मिळणार

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

·      श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारताच्या पाच बाद ३०० धावा

आणि

·      मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता; परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

****

अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी काल अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावर भारताचं अंतराळ क्षेत्र वेगानं विस्तारत असून, जेन झी अभियंते, डिझायनर्स, कोडर्स आणि शास्त्रज्ञ नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतराळ क्षेत्रात खासगी आस्थापनांचाही वाढता सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

****

राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

****

राज्यातल्या नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. या मानकांमुळे ग्रामीण रुग्णालय ते उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन‍निर्णय काल जारी करण्यात आला.

****

राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं चार सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्यांतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास १ ते ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड, परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

****

अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला असून, जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. संपूर्ण राज्यात २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिवस साजरा करुन, वॉकेथॉनच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. लोकांना सोबत घेऊन या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं राठोड यांनी सांगितलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६८ वा वर्धापन दिन काल उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी, भास्कर मुंढे यांना, नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परिक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ठ प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुस्काराने गौरवण्यात आलं.

****

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधल्या नवजात शिशू अतिदक्षता विभाग अर्थात एसएनसीयूमध्ये, आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. आगीची घटना घडल्यानंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने नवजात बालकांना सुरक्षित स्थळी हलवलं, जखमी बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

****

खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला साहाय्य केल्या प्रकरणी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण १६ कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर २०२२ ते २०२६ या कालावधीत तब्बल दोन हजार १४३ कोटी ७९ लाख ४३ हजार ७६० रुपये परदेशात पाठवायला साहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं असून, पुढील तपास सुरु आहे.

****

एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन २०२५’मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा काल राज्य स्तरावर गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर इथं आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांच्या हस्ते डॉ. तडस आणि चौधरी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ब्रह्मगाव शिवारात वाघानं गाईची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी पाहणी केली. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, मात्र शेतात जाताना काळजी घ्यावी, संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं वन विभागाला माहिती द्यावी, असं आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केलं आहे.

****

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि परभणीच्या आत्मा विभाग यांच्या वतीने पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर, माटेगाव, खांबेगावसह अनेक गावात काल जीवामृत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. एकात्मिक पद्धतीने प्रत्येक गावात दोन हजार लिटर जीवामृत तयार करण्यात येणार आहे. जीवामृत, दशपर्णी अर्क यामुळे खतांच्या वापर कमी होऊन खर्च बचत होईल तसंच चिकट सापळे आणि पक्षी थांब्यांमुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होईल, असं आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं.

****

मराठा आरक्षणासंदर्भातल्या विविध मागण्यासांठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २९ ऑगस्टपासून होणाऱ्या उपोषण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोदापट्ट्यातल्या १२३ गावांतल्या मराठा समाज बांधवांची नियोजन बैठक काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पार पडली. राज्यभरातून मराठा बांधव २८ ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत, त्यांनी शेतपिकांचं नुकसान होणार नाही, तसंच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या ४०व्या पुण्यतिथीनिमित्त आज नांदेड इथं श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी १५० मधुमेहींची तपासणी, १६० जणांची नेत्र तपासणी करण्यात आल्याचं आश्रमाचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं दर्शनासाठी आलेल्या कावड यात्रेतल्या दोन डीजे चालकांमधल्या स्पर्धेमुळे एका १९ वर्षीय भाविकाच्या मृत्यू झाला. श्रावण महिन्यानिमित्त औंढा नागनाथ इथं वाशिम जिल्ह्यातून आलेल्या कावड यात्रा दर्शनानंतर परत निघाल्या होत्या. त्यावेळी दोन डीजे चालकांमध्ये चढाओढ सुरू झाली. एका चालकाने निष्काळजीपणे वाहन मागे घेत दुसऱ्या डीजेला धडक देण्याचा प्रयत्न केला. यात वाहनांच्या मध्ये आल्याने सोमनाथ भानावत यांचा मृत्यू झाला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं शाळांमध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिन्नू पी. एम. यांनी दिले आहेत.

****

भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवस अखेर पाच बाद ३०० धावा केल्या. देवदत्त पडीक्कलनं ११७, तर कर्णधार शुभमन गीलने ५० धावा केल्या. या सामन्यासाठी जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याला प्रथमच संधी देण्यात आली आहे.

****

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास पंधरा मिनिटं झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला आहे.

****

राज्यात आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment