▼

Monday, 24 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

अमरावतीमधल्या स्त्री जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटेच्या सुमारास आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ३९ बालकांवर उपचार सुरू होते. एका व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने बालकांना सुरक्षित बाहेर काढलं. यातल्या सहा नवजात बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना दुःखद आणि हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले असून, घटनेतल्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. तसंच, आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव या दोघांनाही आजच अमरावती इथं भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, तसंच जखमी बालकांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभं असून, प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ काला अंब इथं १६ एकर जागेवर ‘शौर्य स्मारक’ उभारणं, नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईत नवीन ‘हरियाणा भवन’ उभारणं आणि हरियाणा गुंतवणूक शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रादेशिक आर्थिक सहकार्य वाढवणं, अशा महत्त्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्र आणि हरियाणामधल्या सहकार्याला या भेटीतून नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

****

श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार असून, अनेक शिव मंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराचे दरवाजे पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यापूर्वी विशेष महापूजा, अभिषेक आणि आरती पार पडली.

वेरुळ इथल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिर प्रशासनाकडून दर्शन रांगा, पिण्याचं पाणी आणि सावलीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

****

मुंबईत भुलेश्वर इथं गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी पाच लाख, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी काल या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महापालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले.

****

बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं मोठं कर्करोग रुग्णालय उभारण्याचा संकल्प माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक वैद्यकीय, तांत्रिक आणि प्रशासकीय सुविधांचा अभ्यास सुरू असून, त्यांनी काल नागपूर इथल्या अमेरिकन कर्करोग रुग्णालयाला भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली. यावेळी हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा करून रुग्णसेवेची कार्यपद्धती, उपचार विभाग, अत्याधुनिक यंत्रसामग्री, रुग्णांसाठीची व्यवस्था आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांची त्यांनी माहिती घेतली.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर-लामजना महामार्गावर काल रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं, तसंच लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

****

हंगेरीमध्ये आयोजित कानिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १९ वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम.ने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावलं. स्पर्धेच्या नवव्या आणि अंतिम फेरीत प्रणेशने जर्मनीच्या खेळाडूचा पराभव केला. प्रणेशने नऊ फेऱ्यांमध्ये सात गुणांची कमाई करत अन्य चार खेळाडूंसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावलं.

****

नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचं उपांत्य फेरीत पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत एकही गोल करता आला नाही. ई गटातील साखळी सामन्यांनंतर भारत तिसऱ्या स्थानावर राहिला, तर नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं.

****

No comments:

Post a Comment