▼

Tuesday, 25 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 25 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

युनिफाइड पेमेंट इंटरफेस - युपीआयने डिजिटल पेमेंट क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२५-२६ दरम्यान युपीआय व्यवहारांच्या संख्येत १३ हजार पट तर मूल्यात चार हजार पट वाढ झाली आहे. जगातल्या ११ देशांमध्ये युपीआय कार्यरत असून, ७०३ बँका या प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत. युपीआयमुळे लहान शहरांपासून ते थेट खेड्यापाड्यांपर्यंत, दैनंदिन कोट्यवधी व्यवहार अवघ्या काही सेकंदांत करणं शक्य झालं आहे. युपीआयद्वारे ३१४ लाख कोटींच्या व्यवहारांसह भारत जगातली सर्वात मोठी रिअल-टाईम पेमेंट प्रणाली बनली आहे. युपीआयची व्याप्ती ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका दशकापूर्वी सुरू झालेल्या युपीआयच्या अभूतपूर्व यशावर प्रकाश टाकत, नागरिकांना त्यांचे युपीआय अनुभव आणि दैनंदिन जीवनावरील प्रभाव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज जपानच्या प्रमुख आर्थिक तसंच गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. भारताच्या विकास प्रवासात जपानची भागीदारी वाढवणं तसंच गुंतवणूक क्षेत्रातलं सहकार्य वाढवणं, यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. भारतातल्या आर्थिक शक्यता, गुंतवणुकीच्या वाढत्या संधी आणि जपानी गुंतवणुकीला अधिक सुलभ बनवण्याबाबतीतही या बैठकीत विचारविमर्ष झाला.

****

गव्हाचं पीठ आणि संबंधित पदार्थांवरच्या निर्यातीवरचे निर्बंध सरकारने उठवले आहेत. त्यामुळे आटा, मैदा, रवा आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं याबाबत अधिसूचना जारी केली असून, निर्यात धोरणातले हे बदल लगेच लागू होतील.

****

राज्यात साखरेच्या दरात गेल्या तीन दिवसांत प्रतिक्विंटल १५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारनं साठेबाजी रोखण्यासाठी उचललेल्या कडक पावलांमुळे बाजारातली कृत्रिम तेजी ओसरू लागल्यानं साखरेचे भाव नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे. साखरेच्या दरात झालेली वाढ कृत्रिम होती, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. घाऊक बाजारात ६७ रुपयांवर गेलेले दर खाली आले असून, किरकोळ बाजारातही प्रति किलो मागे सात रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती साखर संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.

****

निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज त्यांना पदाची शपथ दिली. मुंबईत लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटीकेला भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाद्वारे दुसऱ्यांदा सर्वोच्च थ्री स्टार दर्जा प्राप्त झाला आहे. ही रोपवाटीका विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच दर्जेदार, जातीवंत, किडरोगमुक्त कलमं आणि रोप निर्मितीसाठी ओळखली जाते.

****

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरूवात झाली आहे. सर्व माजी सैनिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या विधवा यांनी त्यांच्या पात्र पाल्यांसाठी नोंदणी करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करता येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर इथं भारतीय प्रादेशिक सेनेत १३६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या मैदानावर आठ ते अकरा सप्टेंबर २०२६ दरम्यान इच्छुक माजी सैनिकांनी निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकाचं काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. या भव्य स्मारकाच्या कामाचा काल त्यांनी आढावा घेतला. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचं नियोजन याला सर्वोच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या. हे स्मारक देशासह जगभरातल्या नागरीकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याने त्याची उभारणी जागतिक दर्जाची असावी, त्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असं शिरसाट यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment