▼

Wednesday, 26 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      प्रकल्पांची जलदगतीने पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

·      शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल

·      प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार

·      आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा

आणि

·      श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाची मजबूत पकड

****

प्रकल्पांची जलदगतीने पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रगती मंचाच्या ५३व्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रकल्पांची वेळेत पूर्तता, विविध संस्थांमधला समन्वय, प्रलंबित मुद्द्यांचं जलद निराकरण आणि अंमलबजावणीचा वेग यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे स्वतंत्र विभाग किंवा टप्पे म्हणून न पाहता एकात्मिक प्रकल्प म्हणून पाहण्याचे निर्देश देताना, प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांना विलंब करणाऱ्या त्रुटी दूर करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकसदृश फसवणुकीच्या प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षण, जनजागृती, सायबर सुरक्षा शिक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवण्यावरही त्यांनी भर दिला. या बैठकीदरम्यान रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रांतल्या नऊ राज्यांमधल्या सहा प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

****

शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाइंड साखरेत रूपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

**

दरम्यान, साखरेच्या दरात काल पुन्हा एका रुपयानं वाढ झाली आणि एक किलो साखरेचा दर जवळपास ६४ रुपयांपर्यंत गेला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे ४९ रुपये प्रति किलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात ३१ टक्के वाढ झाली आहे.

****

इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमी लेयर निकषांसंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी, या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं ११ मार्चला दिलेला निकाल २०२५ च्या नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही, याबाबत स्पष्टता मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे.

****

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्राने देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यात २०२१-२२ पासून राबवण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३१ हजार ७४६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर इथं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

राज्यातल्या नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब असल्याचं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलं. शासकीय, खासगी आणि धर्मादाय आरोग्य संस्थांमध्ये फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसंच रुग्णालयातल्या संबंधित यंत्रणांचं ऑडिट करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

शासकीय रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. काल मंत्रालयात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ तसंच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून या सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात यावा, असं त्यांनी सांगितलं.

****

ईद-ए-मिलाद-उन-नबी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईदनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलाद-उन-नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा दिवस आहे, प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्य शासनानं अलीकडेच वयाची ३० वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली होती, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ही अट रद्द करण्यात आली.

****

राज्यातल्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या पुढेही सुरू राहणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हे सरकार रोजगार हिरावून घेणारे नाही, तर रोजगार देणारे असून, याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असं ते म्हणाले. मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचं, तसंच, मराठी शिकण्यासाठी चार महिन्याचा कालावधी देणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरता वंशावळ जुळवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर नेमलेल्या समित्यांना एक जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या एक वर्षाच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं काल या संदर्भातला शासन निर्णय जारी केला.

****

धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्ह्यात उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित करावं, असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. धाराशिव इथं आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन काल सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत ३७ उद्योगांसोबत ७ हजार ५३४ कोटी ८५ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून सुमारे ७ हजार ५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांचं फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असं त्यांनी काल यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केलं.

****

मेरा रेशम मेरा अभिमान, उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात मंगरूळ इथं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय रेशीम संशोधन विस्तार केंद्राचे संयुक्त संचालक ए. एल. जाधव यांच्यासह इतर तज्ज्ञांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या २१ हजार ७९३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १८३ कोटी ८५ लाख ८९ हजार ९५६ रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेसाठी पहिल्या प्रसिद्ध झालेल्या यादीतल्या उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

****

क्रिकेट

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेच्या पहिल्या डावात आठ बाद २६५ धावा झाल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी तीन तीन तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. यजमान संघ पहिल्या डावात २३८ धावांनी पिछाडीवर आहे.

****

येत्या दोन दिवसात कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment