Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
August 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.
****
२१ व्या शतकात भारतासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था निर्माण
करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज
दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘खेलो इंडिया डायलॉग’ला संबोधित करत होते. खेळ केवळ पदकं जिंकण्यापुरते
मर्यादित नसून, विकसित भारताच्या उभारणीत भारताचं
क्रीडा कौशल्य आणि युवाशक्ती यांना एकत्र आणण्याचं ते एक अभियान असल्याचं ते म्हणाले.
२०३६ च्या ऑलिम्पिकची तयारी करत असताना, विविध खेळांमध्ये स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंना ओळखण्यावर आणि
त्यांचं संगोपन करण्यावर आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
विस्तीर्ण किनारपट्टी आणि विस्तृत पर्वतीय प्रदेशामुळे
भारताकडे सर्फिंग आणि स्पोर्ट क्लायंबिंगसारख्या जलक्रीडांपासून ते हिवाळी खेळांपर्यंतच्या
खेळांसाठी भौगोलिक अनुकूलता आणि प्रतिभावान खेळाडूंचा साठा आहे. तरीही, या क्रीडा प्रकारांमध्ये आपण जागतिक स्तरावर अजूनही मोठ्या
प्रमाणात अनुपस्थित असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.
‘मेरा युवा भारत’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम राष्ट्रीय
क्रीडा दिन २०२६ च्या उत्सवाचा एक भाग आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात
या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
भारताने नेपाळला ३७ टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि अन्नधान्याच्या पाकिटांची दुसरी खेप पाठवली आहे.
मदत साहित्य घेऊन जाणारं दुसरं विमान रवाना झाल्याची माहिती, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली. भारत नेपाळी
अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून मदतकार्याला पूर्ण सहकार्य करत असल्याचं त्यांनी
सांगितलं.
दरम्यान, नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६० वर पोहोचली
असून, १३३ भारतीय नागरिकांसह ७५० हून अधिक
लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या
किमान ५० यात्रेकरुंचा समावेश आहे.
**
नेपाळमधल्या या परिस्थितीवर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष
आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर
प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. नेपाळमधल्या फुरके खोला इथं हिम सरोवर किंवा
हिमनदी अचानक फुटल्यामुळे त्रिशुली नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. हे ठिकाण भारतीय
सीमेपासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर आहे. या पुराचा परिणाम पुढे भारतातल्या गंडक
नदीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. संभाव्य परिणाम होऊ शकणाऱ्या सीमावर्ती भागांमध्ये
स्थानिक प्रशासन, बचाव पथकं आणि राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आलं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारकडून
भारत-नेपाळ सीमेजवळील नागरिकांसाठी आवश्यकतेनुसार स्थलांतर आणि मदतकार्य सुरू करण्यात
आलं आहे.
****
राज्य लोकसेवा आयोग - MPSC च्या परिक्षांच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या
पार्श्वभूमीची चौकशी करावी, तसंच या परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार
यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत
मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून, आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
यात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
****
नारळी पौर्णिमा आज साजरी होत आहे. श्रावण पौर्णिमेचा हा
दिवस कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करतात. पिढ्यान्पिढ्या चालत
आलेल्या परंपरेनुसार नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
याच दिवशी मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात केली जाते.
****
अनाथ तसंच दिव्यांग मुली आणि महिला स्वच्छता कर्मचारी
यांच्यासह विविध क्षेत्रातल्या महिलांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना काल रक्षाबंधनानिमित्त
राखी बांधली. रक्षाबंधन हा समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या
विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला तसंच मुलींबरोबर यंदा रक्षाबंधन
साजरा केल्यानं आनंद झाल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट
सामन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दुसर्या
डावात सात बाद ३३४ धावा झाल्या होत्या. श्रीलंकेकडे सध्या १२१ धावांची आघाडी आहे.
****
No comments:
Post a Comment