▼

Monday, 3 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांचा गदारोळ-कामकाज तहकूब

·      पंतप्रधान तसंच गृहमंत्र्यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं-काँग्रेसची मागणी

·      पादचाऱ्यांसाठी रस्त्यावर सीमांकित आणि अतिक्रमण मुक्त जागा निश्चित कराव्यात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

·      प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास मंजुरी

आणि

·      स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र आदरांजली

****

नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत विरोधकांनी आजही गदारोळ केला, त्यामुळे वारंवारच्या स्थगितीनंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, नंतर २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.

दरम्यान, विरोधकांच्या घोषणाबाजीतच, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी, भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक २०२६ तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक २०२६ लोकसभेत सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक, २०२६ लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक, २०२६ राज्यसभेत मंजूर करण्यात आलं, त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं.

****

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या कथित वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं, अशीही मागणी खरगे यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली.

****

नीट परीक्षेनंतर एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होणार असून, यावर्षाचं शैक्षणिक सत्र ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी १० सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान होईल.

****

कॉकरोच जनता पार्टीच्या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं २८ जुलै रोजी दिले होते. फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ असलेले समजावं, असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा, याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

दरम्यान, पादचारी तसंच वाहनांसांठीचे मार्ग स्पष्टपणे वेगळे करून पादचाऱ्यांसाठी सीमांकित आणि अतिक्रमण मुक्त जागा निश्चित कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आलोक आराध्ये यांच्या पीठाने हे निर्देश दिले. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा बांधकामाशिवाय हे साध्य करता येईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पादचारी प्रथम अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमणं हटवण्यात येणार आहे. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, तसंच इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

****

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची आणि शेती किंवा पूरक कृषी व्यवसायात कार्यरत असलेली महिला ‘महिला शेतकरी’ म्हणून पात्र ठरेल. ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमार्फत अर्ज करून पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. या कायद्यांतर्गत महिला शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय डेटाबेस, महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी, महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि राज्य समन्वय समिती स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. महिला शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण हे या कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी ३९ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. एक लाख ६१ हजार ३७३ मंजूर घरकुल लाभार्थ्यांना या अतिरिक्त राज्य हिस्स्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १९९ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३९ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज ई-२० धोरणाच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं संसदेत अभिनंदन करण्यात आलं. राज्यसभेत सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत अध्यक्ष ओम बिरला यांनी या खेळाडूंचं कौतुक केलं. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. सुवर्णपदक विजेत्यांना ३० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना २० लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्यांना १० लाख रुपयांची बक्षीसं प्रदान करण्यात आली. या खेळाडूंना क्रीडादूत म्हणून शाळा तसंच महाविद्यालयांना भेटी देण्याचं आवाहन मांडविया यांनी केलं.

****

स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आलं. मनपा मुख्यालयात आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

 

नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मायादेवी नरवाडे, यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनीही नाना पाटील यांना अभिवादन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. ठेवीदारांच्या पैशांची तातडीने परतफेड, संस्थेच्या मालमत्ता ताब्यात घेऊन विक्री प्रक्रिया गतीने पूर्ण करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता १० ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत पीक विमा भरावा, असं आवाहन केलं आहे.

****

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या १ ऑगस्टपासून जागतिक स्तनपान सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गर्भवती महिला, स्तनदा माता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन ‘आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम अन्न’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी केलं आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं उघडीप दिली असून, पुढचे तीन दिवस या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यात घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात सध्या सुमारे २० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

****

No comments:

Post a Comment