▼

Wednesday, 5 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      विनियोजन विधेयक २०२६ लोकसभेत पारित, तर जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

·      सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी

·      गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला तीन वर्ष मुदतवाढ

·      जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

आणि

·      जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९३ टक्क्यांवर गोदावरी नदीपात्रात १९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरु

****

लोकसभेत काल विनियोजन विधेयक, २०२६ मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या विधेयकानुसार, एक मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विशिष्ट सेवांवर मंजूर रकमेपेक्षा झालेल्या अतिरिक्त खर्चाच्या पूर्ततेसाठी भारताच्या एकत्रित निधीतून रक्कम काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सरकारने ५४ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली असून, हा निधी प्रामुख्याने कर्ज परतफेडीसाठी वापरण्यात येणार आहे. डेटा सेंटरना करात सवलत देणारं विधेयकही सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं.

राज्यसभेने काल जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२६ मंजूर केल्यानंतर संसदेची या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत मंजूर झालं होतं. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं. जन्म आणि मृत्यूच्या घटनांची वेळेवर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणं तसंच उशिरा होणाऱ्या नोंदणीसंदर्भातल्या तरतुदी अधिक प्रभावी आणि कडक करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.

**

राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक २०२६ अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं, हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा गुन्ह्यांमधून लुबाडलेल्या रकमेच्या व्यवहारांकरता सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात, त्यांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एका महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी, असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देशही पीठानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.

****

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला तीन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, आता या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तसंच बीड जिल्ह्यात केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली.

महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची तीन नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.

****

सध्या सुरू असलेल्या मतदार सखोल पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंच्या गृहभेटींना येत्या १७ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय काल जारी करण्यात आला. या सखोल पुनरीक्षणानंतर २४ ऑगस्टला अंतरिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर २३ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती सादर करता येणार असून, २२ ऑक्टोबरपर्यंत या दाव्याचं निराकरण होणार आहे. २७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. 

****

यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणं शक्य नाही परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू, असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगीही राज्यशासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. या संदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देणार असल्याचं, न्यायालयाने सांगितलं आहे.

****

माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलेले डी.वाय. पाटील यांनी प्रारंभीच्या काळात कोल्हापूरचं महापौरपद भुषवलं. विधानसभेत पन्हाळा मतदार संघाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं. त्रिपुरा तसंच बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळलेले पाटील यांनी काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. 

डी वाय पाटील यांच्या डी. वाय. पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तीन हून अधिक अभिमत विद्यापीठं, सहा खाजगी विद्यापीठं आणि १८० पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत. शिक्षण आणि सामाजित कार्यातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं. पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

**

डी.वाय.पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी दु:ख व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरवलं, या शब्दांत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातून डी. वाय.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

****

जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल मुंबईत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे ११२ हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा, तसंच प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गाचा विचार करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी पादुकांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं. परतवारीच्या प्रवासात शहरात आलेल्या या पालखीचं भाविकांनी सहर्ष स्वागत केलं. आरती, प्रसाद वितरण झाल्यानंतर पालखी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा काल बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज ही पालखी बीड शहरात दाखल होणार आहे.

****

इंडियन मेडिकल असोसिएशन- आयएमएच्या लातूर शाखेनं BHMS-CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात, आज २४ तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे. शासनानं हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आयएमएनं दिला आहे.

****

आरोग्य क्षेत्रात आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून १९ हजार २६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावांतल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जायकवाडीच्या नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. सध्या धरणात सुमारे ४५ हजार ४४० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, धरणाची पाणी पातळी ९३ टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

****

हवामान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment