Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवत असल्याचं राष्ट्रपतींचं
प्रतिपादन
· ‘भारत छोडो’
आंदोलनातल्या हुतात्म्यांना संसदेच्या दोन्ही सदनात आदरांजली
· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला
हप्ता बँकखात्यात जमा
· मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णयात दुरुस्तीची आंदोलनकर्ते मनोज
जरांगे यांची मागणी
· पहिल्या ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सवाचं पुढच्या वर्षी भारतात
आयोजन
आणि
· कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज
तसंच अस्मिता चलिहा उपांत्य फेरीत दाखल
****
हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असं प्रतिपादन
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी केलं आहे. बाराव्या राष्ट्रीय हातमाग दिना निमित्त आज
वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी
राष्ट्रपती बोलत होत्या. वीणकरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला थेट प्राप्त होण्याचा
मार्ग मोकळा झाल्याचं, राष्ट्रपतींनी सांगितलं. त्या म्हणाल्या
-
बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
या कार्यक्रमात देशभरातल्या तीन वीणकरांना संत कबीर हातमाग पुरस्कार
आणि १९ कारागिरांना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात
आले. चार विशेष टपाल तिकिटांचं अनावरण ही यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं.
७ ऑगस्ट १९०५ रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून
स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग
दिवस म्हणून साजरा केला जातो.
नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि
त्याचा व्हिडीओ तयार करुन तो प्रसारित करावा, असं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त
आम्ही त्या विणकरांना आणि कारागिरांना सलाम करतो, असं
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं केंद्रीय वस्त्रोद्योग
मंत्रालय आणि आणि मुंबईच्या बुनकर सेवा केंद्रातर्फे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात
आला.
****
नीट परीक्षा मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान
झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे
संसदेचं कामकाज आजही बाधित झालं.
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 'भारत
छोडो'
आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. नऊ ऑगस्ट रोजी
भारत छोडो आंदोलनाला ८४ वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी
विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या कथित पोलीस कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन
देण्याची मागणी लाऊन धरली. यावरुन गदारोळ वाढल्याने सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि
नंतर सोमवार पर्यंत स्थगित झालं. त्यापूर्वी सूक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक, लोकसभेनं मंजूर केलं.
****
राज्यसभेतही 'भारत छोडो' आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर, मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर विविध कागदपत्रं तसंच विविध स्थायी समित्यांचे
अहवालही मांडण्यात आले. नीट मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या
कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाने गदारोळ सुरू केला. गदारोळ सुरूच राहिल्याने
राज्यसभेचे कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित झालं.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत
आज एकूण सहा लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार २९ कोटी रुपयांचा पहिला
हप्ता जमा करण्यात आला, मुंबईत कर्जमाफी योजनेच्या आढावा
बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना ही माहिती
दिली. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम आणि दुसऱ्या
टप्प्यात प्रोत्साहन पर रक्कम जमा केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. २५ जुलै
रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू असून
प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरूवात झाल्याचं फडणवीस
यांनी यावेळी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार ५४० शेतकऱ्यांना
आज २३१ कोटी १५ लाख रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले आहे. र्इ - केवायसी
पुर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश असल्याचं छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे
उपनिबंधक समृत जाधव यांनी सांगितलं आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३०१ शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
जिल्ह्यातील ३७ हजार ४७१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी असून १४ हजार १५६
शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याचं निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांनी लवकरात
लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असं
आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा निवडणुकीत उत्तर देऊ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी
दिला आहे. ते आज बीड इथं पत्रकारांशी बोलत
होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र
दिल्याचा आरोप केला. या संदर्भातील निर्णय आणि भूमिका सरकारने तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
****
पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार
आहे. मुंबई इथं सुरू असलेल्या ब्रिक्स वेव्हज बझारच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत
ही घोषणा आज करण्यात आली. याशिवाय देशातल्या विविध चित्रपट संस्थांनी ब्राझील, रशिया,
व्हिएतनाम यासारख्या विविध देशांतल्या संस्थांशी चित्रपट आणि
मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट विकास
महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी ही माहिती दिली. या दोन दिवसीय
वेव्हज ब्रिक्स बझार उपक्रमाचा आज समारोप होत आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सिंगापूर
इथल्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. रायगड-पेण ग्रोथ सेंटर आणि नियोजित
तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी हे करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजित विस्तार, रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग
आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मराठवाड्याची ‘मागास’ प्रतिमा बदलून विकासाचं नवं पर्व सुरू करण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी आणि
एकात्मतेने कार्य करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी
केलं आहे. विकसित महाराष्ट्र कृती आराखडा 2030 अंमलबजावणी अंतर्गत "विकसित मराठवाडा" संकल्पना राबवण्याबाबत
आज छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या
बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या विविध योजना, लोकसहभाग
आणि विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात
आणायचे आहे. यासाठी प्रत्येक विभागाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी “वॉर रूम” तयार करण्यात
येणार असून त्या माध्यमातून प्रलंबित तथा प्राध्यान्याच्या विषयांचे निराकरण केले जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात ‘हरित धाराशिव अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात
दहा लाख वृक्षलागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या ३३ हेक्टर क्षेत्रात येत्या १४ ऑगस्ट
रोजी अवघ्या १२ तासांत १० लाख वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. या उपक्रमात सहभागी
होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित वक्तव्याच्या
निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बीड शहरात बशीरगंज चौक इथं
आंदोलन केलं. आंदोलनात महिला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी
आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं पाच उपविभागांमधील पोलीस पाटील
यांचा महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. लातूर,
निलंगा, उदगीर, औसा-रेणापूर आणि अहमदपूर या पाच उपविभागांतील पोलीस पाटील यांचा यात समावेश आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या उपकृषी अधीक्षक विश्वनाथ गावित
याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सतरा हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ठिबक सिंचनची मोका तपासणी करून अहवाल सादर
करण्यासाठी गावित याने या लाचेची मागणी केली होती.
****
जनावरांची चोरी मांसविक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला आज लातूर
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत परभणी जिल्ह्यातील
तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २४ लाख ६८ हजार
रुपयांची रोकड जप्त केली.
****
दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन
स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज तसंच अस्मिता चलिहा, यांनी
उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने भारताच्याच तन्वी शर्माचा
२१-१८,
१९-२१, १९-२१ असा पराभव केला. आता उपांत्य
फेरीत तिचा सामना भारताच्या अस्मिता चालिहा हिच्याशी होईल. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद
गर्ग आणि पृथ्वी रॉय यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून सहा हजार २२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने
पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे चार हजार ३२८ घनफूट, उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट
प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने
पाण्याची आवक सुरू असून, पाणी साठा ९३ टक्क्यांवर स्थिर
आहे.
****
No comments:
Post a Comment