Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑगस्ट २०२६ सायंकाळी
६.१०
****
· देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह-राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा
· साखर विक्रेते, वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी
साठा मर्यादेबाबत सूचना जारी
· नेपाळमध्ये पुरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य सुरु, राज्यातले सुमारे दीडशे भाविक उद्या परतणार
आणि
· ग्रँड चेस टूरचं विजेतेपद जिंकणारा आर. प्रज्ञानंद ठरला पहिला
भारतीय बुद्धीबळपटू
****
देशभरात आज रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत आहे.
दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध शाळा आणि
संस्थांमधील मुलांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केला. राष्ट्रपती मुर्मु
यांनी प्रेम आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेली राखी कुटुंबातील सदस्य, मित्र तसेच झाडांनाही बांधता येते असं सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे रक्षण
करण्याचं आवाहन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण सर्वांमधील स्नेह आणि सलोख्याचे
बंध दृढ करतो आणि सुख-समृद्धी घेऊन येतो, असं आपल्या शुभेच्छा
संदेशात म्हटलं आहे.
सांगली इथंल्या शांतिनिकेतन मध्ये शिकत असलेल्या मुलींनी परिसरातील
वृक्षांना राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरा केला.
छत्रपती संभाजीनगर इथं आमदार अंबादास दानवे यांनी आज रक्षा बंधन
दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत साजरा केला.
****
‘प्रधानमंत्री जन धन योजने’ला आज बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘जन धन योजने’ने अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी
परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५९ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून, त्यामध्ये एकूण ३ लाख १७ हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी
७८ टक्के खाती ग्रामीण किंवा निम-शहरी भागातील असून ५६ टक्के खाती महिला ग्राहकांची
आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन बळकट झाले असून, थेट
आर्थिक मदत अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
****
राज्य शासनाच्या अन्न, नागरी
पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने साखर विक्रेते, वितरक
आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि
वितरकांना चारशे मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसेच, साखर प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात
आली आहे. दरमहा दहा मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना साखर
प्राप्त झाल्यापासून पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. हे निर्बंध
३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्नसाठा
देखरेख पोर्टलवर तात्काळ नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती भरावी आणि त्यानंतर
प्रत्येक शुक्रवारी ही माहिती अद्ययावत करावी, असे
निर्देश शासनाने दिले आहेत. राज्यातील साखर कारखाने, व्यापारी, वितरक आणि मोठे ग्राहक यांच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी सत्तावीस
ऑगस्टपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा
अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथके गठीत करण्यात आली आहे.
****
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग
आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक जिल्हा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथील कर्मयोगी
दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री
बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केल्यास उत्पादन खर्च २५ ते
३० टक्क्यापर्यंत कमी करून उत्पादकता ४० टक्क्यापर्यंत वाढवता येईल यासाठी देशात कृत्रिम
बुद्धीमत्तेचा उपयोग करत ‘महाविस्तार ॲप’ तयार करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस
यांनी सांगितलं.
****
राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती
प्रक्रियेंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षकपदांसाठी १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस केल्याची
माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे.
****
नेपाळ इथं झालेल्या पूराच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ५३८
वर पोहोचली आहे,
तर एक हजार ५४५ लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकं नदीकाठच्या
आणि दुर्गम वस्त्यांमध्ये वाचलेल्या लोकांचा तसेच प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या मृतदेहांचा
शोध घेत आहेत. अद्याप ३२० भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं.
दरम्यान, आज सकाळी कैलास मानसरोवर यात्रा
पूर्ण करून परतीच्या प्रवासात असलेल्या तिबेटमधील सागा इथले ३७ भाविक न्यालम चेक पोस्टमार्गे
काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत. ठाणे, पुणे, अलिबाग,
रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविक परतीच्या प्रवासादरम्यान
ते सागा इथं अडकले. उद्या काठमांडू इथून हे भाविक विमानाने राज्यात परतणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी
इथं उद्यापासून होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक
खबरदारी घेतली जात आहे. आंतरवाली सराटी इथं एक हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, हे
आंदोलन निर्णयाक राहणार असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत
आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत, अन्यथा मुंबईत मोर्चा काढण्यात
येईल,
असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
****
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं राजकारण करण्याचा प्रकार
काँग्रेसनं तातडीने थांबवावा, असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकारनं
विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे
प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट कशासाठी, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर
घुलेवाडी इथल्या आदिवासी शासकीय वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू
केलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केलेला शासन निर्णय रद्द करावा, यासह इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर गडावर मातृतीर्थ कुंडात एका भाविकाचा
बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातला अनिकेत
वाल्मीक तूरक हा युवक नारळी पौर्णिमा परिक्रमा यात्रेसाठी माहूर इथं आला होता. हा युवक
मातृतीर्थ कुंडात अंघोळ करण्यासाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. जीव रक्षक
दलाच्या जवानांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो खोल गाळात रुतला गेल्याने
त्याला वाचवण्यात यश आले नाही.
****
बँकिंग क्षेत्रात कर्मचाऱ्यासाठी कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा
करण्याच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केलं.
स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन आणि स्टाफ युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या
आंदोलनात विविध बँकांतील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. जुन्या कर्मचाऱ्यांच्या
निवृत्ती वेतनाचे अद्ययावतीकरण करावे, राष्ट्रीय निवृत्ती
वेतन प्रणालीतील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय द्यावा, यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे विनाहेल्मेट
दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. शहराच्या विविध
भागांत राबवलेल्या या मोहिमेत गेल्या चोवीस तासात एक हजार १३० दुचाकीस्वारांवर कारवाई
करत ११ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. नागरिकांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा
वापर करण्याचे आवाहन वाहतुक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केलं आहे.
****
महिलांच्या आशिया करंडक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला आजपासून
दुबई इथं सुरुवात होत आहे. भारतासोबत अ गटात पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग यांचा समावेश आहे. आठ संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेतील साखळी सामने
येत्या आठ सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. रविवारी भारतीय संघाचा सामना थायलंडसोबत होणार
आहे.
****
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद हा ग्रँड चेस टूरचं विजेतेपद
जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. अमेरिकेतील सेंट लुईस इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात
त्याने गतविजेता फॅबियानो कारुआनाचा १५-१३ असा पराभव करून विजय मिळवला. अंतिम सामन्याच्या
सुरुवातीला प्रज्ञानंद कारुआनापेक्षा सहा गुणांनी मागं होता, पण दोन्ही रॅपिड सामने जिंकून त्यानं आघाडी घेतली.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रानं २०२६ डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान
मिळवलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी चार आणि पाच सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स इथं होणार
आहे. नीरजने डायमंड लीगच्या दोन टप्प्यांमध्ये सहभाग घेतला. लॉझानमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये
मिळालेल्या गुणांमुळे निरजला डायमंड लिग मध्ये अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे.
****
बीड इथं आज जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतींन राष्ट्रीय क्रीडा
दिन उपक्रमांचं उद्घाटन अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते झालं. जिल्ह्यातील
खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत भारताला पदक मिळवून द्यावं, असं आवाहन धार्मिक यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे रविवार, ३० ऑगस्ट रोजी १४ वर्षांखालील गटातील खेळाडूंच्या निवड चाचणीची दुसरी फेरी होणार
आहे. या चाचणीत ३०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर
यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment