Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 29 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय क्रीडा दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा; प्रत्येकाने
दररोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करण्याचं क्रीडा मंत्र्यांचं
आवाहन
· महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कायद्यात सुधारणा; जिल्हा
परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या स्विकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
· पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार
· मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या अकराव्या
आमरण उपोषणाला सुरुवात
आणि
· बीड इथल्या खरेदी केंद्रात रेशीम कोषाला तब्बल ९३ हजार रुपये प्रतिक्विंटल असा
विक्रमी भाव
****
राष्ट्रीय क्रीडा दिन आज विविध
कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. देशाचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद
यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त तंदुरुस्ती, शिस्त, संघकार्य
आणि उत्कृष्ट कामगिरी या क्रीडा क्षेत्रातल्या मूल्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती
सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय
यांनी देशवासियांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नवी दिल्लीत मेजर
ध्यानचंद स्टेडियम परिसरातल्या मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला मांडविय यांनी
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत प्रत्येकाने
दररोज किमान एक तास क्रीडांगणावर घालवण्याचा संकल्प करावा, असं
आवाहन त्यांनी केलं.
बाईट - केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख
मांडविय
**
२०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग
आणि पदकसंख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची
गरज आहे, असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं. राष्ट्रीय
क्रीडा दिनानिमित्त,
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या
प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते आज पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना, ऑलिम्पिक
संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी पाच ते १५ वर्षं वयोगटातल्या मुलांमधले
क्रीडा गुण हेरावेत,
लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य
प्रशिक्षण,
मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं
त्यांनी सुचवलं.
**
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठातल्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा
दिनाचं औचित्य साधून मुला-मुलींची सहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
लातूर, नांदेड,
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतल्या खेळाडूंनी या स्पर्धेत
उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या गटात गंगाखेड इथला प्रतीक पवार यांनी तर
मुलींच्या गटात लातूर इथल्या पुष्पा राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
****
राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत
समित्यांमधल्या स्विकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता
फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणूक झालेल्या राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५
पंचायत समित्यांमध्ये स्विकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी ग्रामविकास
विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कायद्यात
सुधारणा केली असून,
याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.
यानुसार जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधल्या एकूण सदस्यांच्या किमान दहा
टक्के किंवा सर्व जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येकी किमान पाच आणि पंचायत समित्यांमध्ये
किमान एका स्विकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं ग्रामविकास विभागातून
सांगण्यात आलं आहे.
****
आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण
करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य
केल्या असून,
राज्यभरात विविध ठिकाणी सुरू असलेली उपोषणं मागे घेण्याचं
आवाहन केल जाणार असल्याचं,
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं. मागण्या
मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतलं
जाणार नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली होती. त्यावर आंदोलक
विद्यार्थ्याना सर्व बाबी लेखी स्वरुपात मिळतील असंही उईके यांनी सांगितलं.
****
नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या ४०४
पर्यटकांपैकी ३३८ जणांशी संपर्क झाला असून, त्यातले ३७ जण मायदेशी परत
यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या ६० पर्यटकांचा
अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या
विविध भागातून गेलेले १४९ पर्यटक चीन किंवा तिबेटमधे सुरक्षित असल्याचं परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे.
राज्यातल्या १०० भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात
आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११
वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
हा या कार्यक्रमाचा १३७ वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं
संपूर्ण नेटवर्क,
न्यूज ऑन एआयआर वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर प्रसारित केला
जाईल.
****
मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित
मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या
अंतरवाली सराटी इथं आजपासून त्यांच्या अकराव्या आमरण उपोषणाला सुरुवात केली.
मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त
केला. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार
प्रमाणपत्रे देण्यात यावीत,
रद्द केलेली प्रमाणपत्रे पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद
गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं तसंच रद्द केलेली प्रमाणपत्रे
तातडीने वितरित करावीत,
सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटियरनुसार कुणबी
प्रमाणपत्रांचं वाटप करावं यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या आहेत. अंतरवाली सराटी
इथं मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा
इशाराही जरांगे यांनी दिला.
दरम्यान, उपोषणस्थळी मराठा
समाजबांधवांची मोठी गर्दी असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
धाराशिव इथल्या कैलासवासी भाई उद्धवराव
पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेले किरण झरकर यांना
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या १७ वर्षांपासून शिल्प निदेशक
म्हणून कार्यरत असलेले झरकर यांनी कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी
कल्याण, संशोधन,
तंत्रज्ञान, साहित्य आणि सामाजिक उपक्रमांच्या
माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाच्या अधिक प्रभावी संधी
उपलब्ध करून देण्यासाठी झरकर यांनी स्किल बुक या संगणक प्रणालीची संकल्पना आणि निर्मिती
केली आहे. याबद्दल आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
बाईट - किरण
झरकर
****
पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात
झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी
अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली
आहे. यासंदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहीलं
आहे. मराठवाड्यातल्या काही भागांत गेल्या ४५ दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे.
पाणीटंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून, त्यामुळे शेतकऱ्यांना
मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
नुकसानीचा
योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या
माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे.
****
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम
कोष खरेदी केंद्रात झालेल्या लिलावात रेशीम कोषाला तब्बल ९३ हजार रुपये
प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे. आजपर्यंतचा हा सर्वोच्च दर ठरल्याने
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत
९१० रुपये प्रति किलोपासून बोलीला सुरुवात झाली, त्यानंतर ९१५, ९२०
आणि ९२५ रुपयांपर्यंत दर वाढत गेला. व्यापाऱ्यांमधील स्पर्धेत अखेर ९३० रुपये
प्रतिकिलोचा सर्वोच्च भाव निश्चित झाला. या केंद्रात गेल्या सहा वर्षांत २६७
कोटींची उलाढाल झाली आहे.
****
जालना शहरातली अनधिकृत बांधकामं आणि
अतक्रिमणांविरोधात महानगरपालिकेने मोहीम तीव्र केली आहे. आज जुन्या जालन्यातल्या
भाग्यनगर उड्डाणपुलाखाली असलेली १९ अनधिकृत अतक्रिमणं महापालिका पथकाने हटवली.
दरम्यान, याठिकाणी पुन्हा अतक्रिमण केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार
कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
महाराष्ट्रात लागू झालेल्या
धर्मांतरविरोधी कायद्याचा सर्वाधिक फायदा मुस्लिम समाजाला होईल, असं
मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलं
आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सक्ती, फसवणूक, प्रलोभन
किंवा विवाहाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतरांवर या कायद्यानुसार कारवाईची
तरतूद करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment