Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 30 August 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०
****
· ‘अंमली
पदार्थमुक्त भारत’ साध्य करण्याचं पंतप्रधान मोदी यांचं ‘मन की बात’द्वारे आवाहन
· पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य पुरस्कार ओली दाराजली
दोस्तलिक प्रदान
· योगसाधनेला शाळा-महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक-
राज्यपाल जिष्णू देव वर्मा
आणि
· परभणीच्या विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री शिंदे
यांची ग्वाही
****
विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त
युवा या देशभरात सुरु असलेल्या मोहिमेतून ‘अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली
पदार्थमुक्त भारत’ साध्य करण्याचं उद्दीष्ट असून यात मोठ्या संख्येनं देशाची युवा
पिढी सहभागी होत आहे. भारताच्या तरूणांच्या आरोग्य, आनंद आणि उज्जवल
भविष्यासाठीचा हा सामूहिक संकल्प आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
आज पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील 'मन
की बात' या कार्यक्रमाच्या १३७व्या भागातून
देश-विदेशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम
संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही भोगावे लागतात असं मोदी म्हणाले. अंमली
पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत
करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली. अंमली पदार्थ-मुक्त
भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं. याबाबत NashaMuktYuva हा हॅशटॅग वापरुन,
समाज माध्यमावरुन याचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी
केलं.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘हर
घर तिरंगा’ ही मोहीम देशाच्या अभिमानाच्या भावनेला अजून बळकट करते असं सांगून
यातून आठ कोटींहून जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं ते म्हणाले.
‘सूर्यपथ तिरंगा’ या उपक्रमामुळं हा उत्सव जगभरात पोहोचल्याचं सांगत या
प्रयत्नांमुळं समाज एकत्र येतो आणि देशाशी असलेलं नातं अधिक दृढ होतं असं त्यांनी
सांगितलं.
शहरांपासून गावांतल्या रस्त्यांवर रोज
सकाळ ते संध्याकाळ लाखो महिला विविध सामानाची विक्री करतात. अनेकदा, केवळ
भांडवलाच्या अभावामुळं त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नव्हता, मात्र
पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत असल्याचं ते म्हणाले. पीएम
स्वनिधी योजनेतल्या लाभार्थ्यांपैकी जवळपास ४६ टक्के महिला असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. देशातल्या ३५ लाख महिला यात सामील होवून व्यवसाय वाढवत असल्याचं सांगून, जेव्हा
एखाद्या महिलेचा व्यवसाय वाढतो, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचं
भविष्यही त्यासोबत प्रगती करतं आणि महिलेचा आत्मविश्वास वाढतो असं त्यांनी
सांगितलं. तसंच रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल
भविष्यासाठी शुभेच्छा देतो असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी, स्वच्छतेमध्ये
एक मोठा सद्गुण असून जेव्हा एखाद्या
ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात, तेव्हा
होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही. तो त्या जागेची संपूर्ण ओळखच
बदलून टाकतो- त्या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच वाढतं, असं ते म्हणाले.
देशाच्या विविध भागांत स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आपल्याला सतत प्रेरणा देतात
असंही त्यांनी नमूद केलं. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मिशन शक्ती सॅट उपक्रमाची
पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपले सण आणि उत्सव, आपल्या
परंपरांसोबतच,
आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं सांगून
या सणासुदीच्या काळात,
आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं
आवाहन करू इच्छितो असं ते म्हणाले. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय
वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यानंच विस्तारत जाईल असं सांगून इतरांनाही
त्यासाठी प्रेरित करा,
असंही पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
उझबेकिस्तानचे राट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव्ह यांच्यात आज ताश्कंद मध्ये
शिष्टमंडळ-स्तरावर चर्चा झाली. भारत आणि उझबेकिस्तान संबंधांना सर्वसमावेशक
धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेत असून दोन्ही देश ठोस उद्दीष्टं निश्चित करुन पुढं
वाटचाल करतील असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह
यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य पुरस्कार ओली
दाराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला.
****
भारताच्या युवा शक्तीला योग्य दिशा
देण्यासाठी योगसाधनेला शाळा-महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक
असल्याचं प्रतिपादन
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं
आहे. लोणावळा इथं कैवल्यधाम योग संस्थेत स्वामी कुवलयानंद यांच्या १४३व्या
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात पात्र योग शिक्षक अथवा प्रशिक्षकाचं
स्वतंत्र पद निर्माण केलं पाहिजे, यामुळं युवकांच्या आरोग्य आणि
व्यक्तिमत्त्व विकासासोबतच प्रशिक्षित योग व्यावसायिकांसाठी रोजगार आणि
उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असं राज्यपालांनी यावेळी
नमुद केलं.
****
नेपाळमध्यल्या अचानक आलेल्या महापुरात
मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आज ७६८ वर पोहोचली असून जवळपास अडीच हजार लोक
अद्याप बेपत्ता आहेत. पूरग्रस्त भागातून आतापर्यंत १०८ भारतीय नागरिकांची सुटका
करण्यात आली असून,
५० नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं परराष्ट्र
मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. २७५ भारतीय नागरिक अद्याप
बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या बचाव आणि मदत कार्यासाठी भारतातून
११ टन मदतसामग्री घेऊन चौथं विमान काठमांडूमध्ये दाखल झालं असून, ही
मदतसामग्री नेपाळ सरकारकडं सुपूर्द करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस.
जयशंकर यांनी सांगितलं.
****
परभणीच्या विकासाठी निधी कमी पडू दिला
जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या
प्रमुख उपस्थितीमध्ये आज परभणीत शेतकरी संवाद मेळावा झाला, त्यावेळी
ते बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून हे सरकार विकासाला गती
दिल्या शिवाय राहणार नाही,
असं उपमुख्यमंत्री म्हणाले. परभणीत नवीन एमआयडीसी उभारण्यात
येईल, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यांनी या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत
यांच्याशी दूरध्वनीवरुन जाहीर संवाद साधला. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे
सरकार करत असून ओबीसीचे अधिकार कमी न करता त्यांना सवलती देण्याचं काम केलं
असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. सरकार समाजाच्या पाठीशी आहे. गरीब समाजाला न्याय
दिला पाहिजे,
हे सरकारचं धोरण असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले.
****
न्याय संस्था आणि विधी सेंटर फॉर लीगल
पॉलिसी यांच्यातर्फे बालकांना
त्यांच्या संविधानिक हक्कांची माहिती
सहज, आनंददायी पद्धतीने मिळावी, यासाठी प्रत्येक बालकानं जाणून घ्यावेत
असे १८ मूलभूत हक्क हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. याचं लोकार्पण महिला आणि
बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं.
****
उत्तर रेल्वेनं अमृतसर-हजूर साहिब
नांदेड-अमृतसर दरम्यान विशेष आरक्षित रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही
रेल्वे मागणीनुसार सोडण्यात येणार असून उद्या रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी
नांदेड इधून सुटेल अशी माहिती रेल्वे जनसंपर्क विभागानं दिली आहे. ही रेल्वे
अमृतसर इथून सहा सप्टेंबर रोजी नांदेडकडे निघेल.
****
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात
यावं आणि हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करावी, या प्रमुख
मागण्यांसाठी अंतरवाली सराटी इथं पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे
पाटील यांचं उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. नुसत्या चर्चा करून किती दिवस
मराठा समाजावर अन्याय करणार, असं नमुद करत या संदर्भातल्या सरकारच्या
भूमीकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या दररोजच्या
२०० टन ओल्या कचऱ्यापासून इंधन म्हणून वापण्याजोगा जैववायू निर्मितीचा प्रकल्प
उभारण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशननं तयारी दर्शवली आहे. यासाठी महापालिका
आणि भारत पेट्रोलियम दरम्यान सुरू चर्चांच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी
कराराला मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी या
संदर्भातली माहिती आज दिली.
****
अहिल्यानगर ते बीड डेमू अर्थात डिझेवर
चालणाऱ्या बहुविभागीय रेल्वेच्या वेगात वाढ करण्यात आली असून, एक
सप्टेंबरपासून मध्य रेल्वेचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. यामुळं प्रवासाचा
वेळ एक तास ३५ मिनिटांनी कमी होणार आहे. ही रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी पावणे आठ वाजता
सुटून पावणे बारा वाजता बीडला पोहोचेल. परतीची रेल्वे बीडहून दुपारी १२ वाजता
सुटून चार वाजता अहिल्यानगरला पोहोचेल. मार्गावरील सर्व प्रमुख थांबे कायम राहणार
आहेत. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं, असं
आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.
****
एसएनडीटी विद्यापीठाच्या उत्तर
महाराष्ट्र प्रादेशिक युवक महोत्सवाचं आज बीडमध्ये तुलसी महाविद्यालयात उत्साहात
उद्घाटन झालं. यामध्ये ४९ महाविद्यालयं, ८१० स्पर्धक अन २८ कला
प्रकार रंगत आहेत.
****
महिलांच्या आशिया चषक टीट्वेंटी क्रिकेट
स्पर्धेत आज दुबईत भारताचा सामना थायलंडशी रात्री साडे आठ वाजता खेळवला जाणार आहे.
वर्ष २०२४ मध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभव
झाल्यानंतर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलं होतं. भारतानं २०१२, २०१६
आणि २०२२ मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
No comments:
Post a Comment