▼

Tuesday, 1 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटना - एससीओच्या २६व्या शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. आज ही परिषद सुरु झाली. यंदाची शिखर परिषद SCOच्या स्थापनेच्या २५व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत होत आहे. भारत २०१७ पासून SCOचा पूर्ण सदस्य आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत भारताच्या सात पूर्णांक आठ टक्के जीडीपी विकासदराचं स्वागत केलं असून, देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. हा विकास दर देशाची सामूहिक शक्ती आणि नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक संघर्ष, पुरवठा साखळीतले अडथळे आणि कोविडनंतरची अस्थिरता अशा आव्हानांनंतरही भारत वेगाने प्रगती करत आहे. विकासाची ही गती कायम ठेवत आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी पुढे जाण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.

****

रसायन आणि खत मंत्री जे. पी. नड्डा आज स्वच्छता पंधरवडा-२०२६ चा शुभारंभ करणार आहेत. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, तसंच कापडी पिशव्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या बाटल्यांचा वापर वाढवणं, यावर या अभियानात विशेष भर दिला जाणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाचा उद्देश कार्यालयीन तसंच डिजिटल कार्यस्थळांवर स्वच्छतेला प्रोत्साहन देणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि कार्यसंस्कृतीत सकारात्मक सुधारणा घडवून आणणं हा आहे.

****

फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्रयांनी यावेळी केला.

****

५२ भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्यसरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भटके- विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही शिंदे यांनी सांगितलंs.

****

भटके-विमुक्त गौरव दिनानिमित्त नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘भटके-विमुक्त समाज: इतिहास, शिक्षण, विकास आणि सक्षमीकरण’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. भटके-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणणं ही केवळ शासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं मत प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी व्यक्त केलं. या कार्यशाळेत लातूरच्या भटके-विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाह नरसिंग झरे, छत्रपती संभाजीनगर इथल्या पालावरील शाळा चे प्रकल्प समन्वयक राजेंद्र मेहता तसंच नांदेडचे इतर मागास-बहुजन कल्याण अधिकारी उमेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिली असून, पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये तातडीने शास्त्रीय पद्धतीने पीक पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्याची सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे केली आहे. सर्व तालुक्यांमध्ये कृषी विद्यापीठातले संबंधित शास्त्रज्ञ, पीकशास्त्रज्ञ, हवामानशास्त्रज्ञ, तसंच महसूल आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांची संयुक्त पथकं नियुक्त करावीत, या पथकांनी संभाव्य उत्पादनातली घट, तसंच पिके वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या तातडीच्या उपाययोजनांची माहिती अहवालात नमूद करावी, असंही पाटील यांनी सांगितलं आहे.

****

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचं विशेष अभियान राबवण्यात येत आहे. १० डिसेंबर पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये ३० वर्षे आणि त्यावरील महिला तसंच पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्यात येणार आहे.

****

राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत बीड जिल्ह्यातल्या दिमाखवाडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतल्या पाच विद्यार्थ्यांची हैदराबाद अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तीन सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या या दौऱ्यात वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक संस्थांना भेटी देऊन विद्यार्थी प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत.

****

No comments:

Post a Comment