▼

Thursday, 17 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

आज ७९ वा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. पोलिस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी, आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मराठवाड्यातील दुष्काळाचं निर्मूलन करण्याच्या संकल्पाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना पुनरुच्चार केला. उल्हास खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचं काम लवकरच पूर्ण होईल, असं सांगून नजिकच्या भविष्यात छत्रपती संभाजीनगरला दररोज पाणी पुरवठा करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळाला असून, राज्यभरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

****

बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना प्रशासनातर्फे अभिवादन करुन स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आलं. याचसोबत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण अभिवादन केले.

****

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालना इथं, टाऊन हाल स्थित हुतात्मा स्मारकात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. सर्वप्रथम मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. मुख्य ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी जिल्हावासियांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

नांदेड इथं आज, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठात, कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तसंच विद्यापीठ ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले. तसंच,स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ३२ झाडे, तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त ७९ झाडे, अशी एकूण १११ झाडांची लागवड विद्यापीठ परिसरात करण्यात आली.

****

धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री नरहरी झीरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ. सुशील धसकटे यांचं ‘मराठवाडा : भाषा आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

****

बीड-पुणे रेल्वे सेवेचा आज बीड रेल्वे स्थानकावर शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास 'जनसेवेतून राष्ट्रसेवा' या मंत्राने आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेने घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, सरकार २०४७ पर्यंत 'विकसित भारत' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्त आणि आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे.

****

No comments:

Post a Comment