▼

Tuesday, 22 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

अंमली पदार्थ विरोधी कृती दल अर्थात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स- एएनटीएफ च्या प्रमुखांची तिसरी राष्ट्रीय परिषद आज नवी दिल्लीत सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. देशाच्या पुढच्या पिढ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्टचक्रातून वाचवण्याच्या दृष्टीनं ही परिषद उपयोगी ठरणार आहे. देशाच्या ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे एएनटीएफ प्रमुख या परिषदेत सहभागी झाले असून, यात, देशातल्या युवकांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीनं धोरणं आखण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेलं-विकसित भारत २०४७ पर्यंत, हे ध्येय ड्रग मुक्त भारत निर्माण केल्याशिवाय साध्य होणार नसल्यामुळे केंद्र सरकार यावर मिशन मोडवर काम करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

****

पाणी आपल्या जीवनासाठी अमूल्य संसाधन असून, पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी आपण जागरूक रहायला पाहिजे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज नवव्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. उपलब्ध जल स्त्रोतांचा सुयोग्य वापर करण्याचं आवाहन करत, जल जीवन अभियानाचा ग्रामीण भागात लाभ होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं ७२वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

****

आधार, आयुष्मान भारत डिजिटल मिशन आणि आभा आयडीच्या माध्यमातून भारतानं एक मजबूत आणि व्यापक डिजिटल आरोग्य व्यवस्था तयार केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केलं आहे. त्या न्यूयॉर्क इथं ग्लोबल साऊथ एआय फ्रेमवर्क या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रात, उपचारासंबंधी निर्णय घेण्यात आणि रुग्णांचं वैद्यकीय रेकॉर्ड तयार करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो असं नमूद करत, एखाद्या रोगाची संभाव्य ठिकाणं जाणून घेणंही एआयच्या मदतीनं शक्य असल्याचं मत श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं.

****

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

****

राज्यातली मुद्रांक शुल्क विभागाची कार्यालयं पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर आधुनिक करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात साठ कार्यालयांचं आणि पुढच्या टप्प्यात राज्यातल्या इतर कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांना सुलभपणे सेवा मिळावी, यासाठी नोंदणी विभागाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यात येणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.

****

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन विभागांच्या पदवीधर मतदारसंघांसाठी तर, अमरावती आणि पुणे विभागांच्या शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी येत्या तेवीस ऑक्टोबरला मतदान होणार असून, सत्तावीस ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या पाच जागांसाठी येत्या सहा ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या पाच जागांवरच्या विद्यमान आमदारांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या सहा डिसेंबरला संपत आहे.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी श्रीलंकेचे पाच गडी बाद करण्याची आवश्यकता आहे. सध्या सुरु असलेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात तीन बाद २१६ धावा केल्या. स्मृती मानधनाने ७९, रिचा घोषनं ४९ तर शेफाली वर्माने ४८ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या      नवव्या षटकात पाच गडी बाद ४९ धावा झाल्या होत्या.

दरम्यान, या सामन्यात भारताच्या स्मृती मानधना हिने ऐतिहासिक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणारी जगातली पहिली क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला आहे. तिने भारताची फलंदाज मिताली राज हिचा दहा हजार ८६८ धावांचा विक्रम मोडला.

आशियाई स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताच्या पुरुष संघाने जपानचा ६३-३१ असा पराभव केला. मुष्टियुद्धात महिलांच्या ५१ किलो वजनी गटात साक्षी चौधरीनं फिलीपाईन्सच्या खेळाडुचा पराभव करत, उप-उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसमध्ये भारताच्या महिला संघाने आज थायलंडचा तीन - दोन असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

****

No comments:

Post a Comment