Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 26
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या ३५८ तालुक्यांपैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये
आज राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात
आला आहे. राज्यातल्या दुष्काळाची ही टक्केवारी ७५ टक्क्यांवर जाते. मुंबई महसूल विभाग
वगळता राज्यातल्या सर्वच विभागातल्या बहुतांश तालुक्यांचा यात समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी यंदाचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षा
भीषण असल्याचे म्हटले होते. आज जाहीर झालेल्या शासन निर्णयातूनही ही दाहकता दिसून येत
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात
९७ टक्के भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे.
आठ जिल्ह्यातील ७६ पैकी ७४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. संभाजीनगरमधील
९ तालुके, बीड, ११, लातूर १०, परभणी ९, जालना ८, धाराशिव ८ हिंगोली ५ तालुके दुष्काळग्रस्त यादीत आहेत. नांदेडमधील १६ पैकी १४ तालुके
दुष्काळाच्या पहिल्या यादीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील केवळ मुदखेड आणि मुखेड या दोनच
तालुक्यांचा या यादीत समावेश नाही. मराठवाड्यातील तालुक्यांची ही यादी पाहता यंदाच्या
दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते.
****
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी
आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला
स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कृषीपंपांच्या वीजबिलातही सवलत दिली
जाणार आहे. ७ पूर्णांक ५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषीपंपांचं वीजबिल आधीच माफ आहे. आता
त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांनाही वीजबिलात सवलत दिली जाणार आहे. दुष्काळग्रस्त
किंवा टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीजजोडणी खंडित केली
जाणार नाही. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात
येणार आहे.
रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी
रोजगार हमी योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामं सुरू करण्यात येणार आहेत.
पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील.
पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन
सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसच दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना
अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****
दरम्यान, दुष्काळामुळे
झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना
देण्यात आले आहेत. पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि जीपीएस आधारित
माहिती संकलित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील
पुढील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचाही समावेश करण्याची प्रक्रिया
सुरू राहणार आहे.
****
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचं
पाठीशी खंबीरपणे उभं आहोत, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी
आज नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या बारूळ फाटा, सोनखेड इथं सोयाबीन पिकाची
पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या:
बाईट – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
यांनी यावेळी शेतकऱ्यांशी नुकसानाबाबत चर्चा केली. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव
बोंढारकर, आमदार विक्रम काळे, लोह्याचे नगराध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
***
हवामान
विदर्भात अनेक भागात काल जोरदार
पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसंच
नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी
क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघानं इराणच्या संघाला पराभूत करीत सुवर्णपदक
पटकावलं. इराणच्या संघावर भारतीय महिला संघाने ३७-३४ अशी मात करीत या स्पर्धेतील तिसरं
सुवर्णपदक देशासाठी जिंकलं.
महिलांच्या ५० मीटर रायफल
थ्री पोझिशन्स स्पर्धा प्रकारात भारताच्या तिलोत्तमा सेन, विदर्सा विनोद आणि आशी चौकसी
या त्रयीने आज रौप्य पदक पटकावलं. भारतीय संघाने १७६३ गुणांची नोंद करत हे यश संपादन
केलं. भारतीय खेळाडूंच्या आजच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात ३ सुवर्णपदाकांसह
एकूण २७ पदके झाली आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
रविवार सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना
संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा १३८ वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment