▼

Monday, 28 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

देश आज सर्जिकल स्ट्राईकचा दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे. २८ आणि २९ सप्टेंबर २०१६ च्या रात्री, लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष्यित कारवाई केली होती. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती, ज्यात १८ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. या कारवाईमुळे दहशतवादाविरोधातल्या भारताच्या सुरक्षा धोरणात एक महत्त्वाचा बदल घडला. त्यानंतर पाकिस्तानविरोधात २०१९ मध्ये बालाकोट आणि २०२५ मध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करण्यात आली. काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं नमूद केलं. 

****

थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. भगतसिंग यांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि शौर्याने स्वातंत्र्य चळवळीत नवी ऊर्जा निर्माण केली. राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्व त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

देशभरातल्या बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून प्रस्तावित असलेला तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं असोसिएशननं समाज माध्यमावरील संदेशात सांगितलं. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

****

भटके-विमुक्त समाजातल्या नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, शासकीय कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभाग आणि इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष अभियान राबवण्यात येत आहे. बीड शहरात काल या शिबिराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज नेकनूर आणि उद्या २९ सप्टेंबरला चौसाळा इथं विशेष शिबिरं होणार आहेत.

****

लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उदगीर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये असलेल्या पीकाचा आता काही उपयोग नसून, त्यामुळे हे पीक वाया जाऊ न देता जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगात आणण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. उदगीर तालुक्यातल्या वाघोली तांडा इथले शेतकरी दिलीप राठोड यांनी आपल्या शेतातला सोयाबीनची धाट गोळा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

नाशिक शहर आणि परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च न्यायालयाच्या अटी, शर्तींचं उल्लंघन करत डीजेचा दणदणाट करणाऱ्या २७ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने सर्व मिरवणुकीबाबत थेट निर्देश देत स्पष्ट निर्बंध घातले असतानासुद्धा शहरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत सर्रासपणे बहुतांश मोठ्या मंडळांनी डीजे साउंड सिस्टिमसह डोळे दिपविणाऱ्या ‘प्लाझ्मा’च्या प्रखर लाइटचा झगमगाट केल्याचे पोलिसांना  आढळून आले होते. पोलिस प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित मंडळांकडून अनामत सुरक्षा ठेव म्हणून घेतलेले ‘डिपॉझिट’चे धनादेश पोलिसांकडून आता या २७ मंडळांना परत केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

****

नाशिकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांसाठी मतदार नोंदणीसह हरकतींसह दोन दिवसांच्या विशेष अभियानात एकूण ११८० जणांनी दावे दाखल केले असून २८५ नागरिकांनी हरकतींचे अर्ज दाखल केले आहेत. तर तब्बल तीन हजार २८० युवकांनी त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करुन घेतली आहे. दोन्ही दिवस केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहून सुट्टीच्या दिवशीदेखील नोंदणी, हरकती करुन घेतल्या. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांचे नाव यादीतून वगळले गेल्यास ते हरकती घेऊ शकतात.

****

बीड जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ घोषित झालेल्या आणि नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या गावांमध्ये ‘जल अर्पण’ कार्यक्रम आयोजित करावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांनी केलं आहे. महिला बचत गट, युवक, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून या अंतर्गत प्रभात फेरी घ्यावी, असं आवाहन त्यांनी यंत्रणांना केलं आहे.

****

जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅकच्या संयुक्त विद्यमाने काल हिमायत बागेत हेरिटेज वॉक घेण्यात आला. इतिहास अभ्यासक आदित्य वाघमारे यांनी या बागेच्या इतिहासाची, निर्मितीची, तर जीएसटी उपायुक्त चंद्रशेखर बोर्डे यांनी बागेतल्या समृद्ध जैवविविधतेची माहिती दिली. महापौर समीर राजूरकर, माजी खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, महापालिका आयुक्त डॉ. अमोल येडगे यांच्यासह शहरातले नागरिक आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.

****

 

 

No comments:

Post a Comment