Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट -पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन
·
दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजनांना सुरुवात, यादीत समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांनाही दिलासा, मुख्यमंत्र्यांची माहिती
·
महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही
आणि
·
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पटकावली सात पदकं, एकूण पदकसंख्या ३७ वर
****
दहशतवादाविरोधात भारताचं
धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १३८ वा भाग होता. सर्जिकल स्ट्राईकला आज दहा वर्षं पूर्ण होत आहेत, त्याचं पंतप्रधानांनी काल मन की बात मध्ये स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय सैनिकांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई
पाहून जग
अचंबित झालं होतं, असं ते
म्हणाले.
बाईट- पंतप्रधान
नरेंद्र मोदी
जनगणना हे प्रत्येक
नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असून, यासाठी वेळ काढण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून
३२ कोटींहून अधिक कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.
सोमनाथ स्वाभिमान पर्व, मोढेरा सूर्य मंदिर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.नशामुक्तीच्या अभियानात तरुणांचा सक्रिय सहभाग, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ मोहिमेतून शेतकरी आणि महिलांना मिळालेली ओळख तसंच पोषण महिन्यानिमित्त कुपोषणाविरोधातला लढा यावरही पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भाष्य केलं. थायलंडमधले गणेशभक्त पंथोन थीरखानोन आणि चियांग माई इथले गणेश हिमाल संग्रहालयाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावावर प्रकाश टाकला. तसंच विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
****
दुष्काळासंदर्भात
करायच्या १२ उपाययोजनांना सुरुवात केली असून, पंचनामे करायची
प्रक्रियाही सुरू झाली आहे, ज्या तालुक्यांचा समावेश नाही, अशाही
तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडनवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बाईट- मुख्यमंत्री
देवेंद्र फडनवीस
फेब्रुवारीपर्यंत
‘अल-निनो’ परिणाम राहील असं तज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे.
प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल, असंही मुख्यमंत्री
म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात
उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तातडीने
अंमलबजावणी करावी, असे
आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्ह्यातल्या हदगाव आणि भोकर तालुक्यातल्या गावांमध्ये पिकांच्या नुकसानीची
पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचाही
ट्रिगर-टू अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकार्यांशी चर्चा
करून अहवाल घेतला असून, या
तालुक्यांचाही यादीत समावेश केला जाईल, असं सावे यांनी सांगितलं.
****
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यात परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या
दुष्काळग्रस्त भागात शेतीपिकांची पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत
जास्त मदत मिळावी, यासाठी
मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातल्या राडी इथं आत्महत्या केलेल्या
कोळगिरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची एक लाख रुपयांची आर्थिक मदत काल दिली.
****
शेगावच्या श्री संत गजानन महाराज
संस्थानने सामाजिक
बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकरी आणि नागरीकांच्या मदतीसाठी एक कोटी ११ लाख रुपयांची मदत दिली आहे. संस्थानच्या वतीने या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री
सहाय्यता निधीला सुपूर्द करण्यात आला.
****
महाराष्ट्रातल्या
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेनवॉटर हार्वेस्टिंगची
प्रभावी अंमलबजावणी, तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक
निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे, अशी
ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिली. धुळे इथं काल एका
कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी ८०० कोटी रुपयांचा निधी
मंजूर झाला आहे, तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून
प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने
प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात
सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. कामगार कायद्यांमध्ये
मोठी सुधारणा करत चार श्रम संहितांची अंमलबजावणी याचाच एक भाग आहे. या कायद्यांविषयी जाणून घेऊ,
केंद्र सरकारने देशातल्या कामगार कायद्यांमध्ये मोठी सुधारणा करत चार श्रम संहिता
लागू केल्या. या श्रम संहितांची सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून अंमलबजावणी सुरु केली.
या चार संहितांमध्ये वेतन संहिता, २०१९; औद्योगिक संबंध
संहिता, २०२०; सामाजिक सुरक्षा संहिता,
२०२०; तसंच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीविषयक संहिता, २०२० यांचा
समावेश आहे. श्रम संहिता ही आतापर्यंतची सर्वात मोठी श्रम सुधारणा असल्याचं प्रतिपादन
पंतप्रधानांनी केलं.
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
किमान वेतनाचा अधिकार, वेळेवर वेतन, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या
ठिकाणी सुरक्षितता यांना या नव्या व्यवस्थेत महत्त्व देण्यात आलं आहे.
****
आशियाई क्रीडा स्पर्धेत काल
महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या अँसी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी
प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा
हिने कांस्यपदक पटकावलं. तसंच, तेजस्विन शंकरने
डेकॅथलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने कांस्य
पदक मिळवलं.
स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं, तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांनी रौप्यपदक मिळवलं. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज उपान्त्यपूर्व फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे दहा वाजता हा सामना सुरु होईल.
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, १६ रौप्य आणि १७ कांस्य पदकांसह एकूण ३७ पदकं जिकंली आहेत.
****
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने आठ गडी राखून विजय मिळवला. काल तिरुवअनंतपुरम इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने प्रथम फलंदाजी करत दिलेलं २९६ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने ४२व्या षटकात पूर्ण केलं. विराट कोहलीनं नाबाद १३९ धावा केल्या. या विजयासोबतच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
शेतात प्रत्यक्ष न जाता
ई-पिक पाहणी संकेतस्थळावर जुनी अथवा इतर ठिकाणची छायाचित्रं वापरून फसवेगिरी
केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या
दोन ई-पिक पाहणी सहाय्यकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. जिवाचीवाडी
आणि कारळवाडी इथल्या या प्रकारात एकूण २२६ बनावट छायाचित्रं नोंदवल्याचं तपासणीत
समोर आलं आहे.
****
सेवा संकल्प
अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या दोन हजार ५२८ शाळांमध्ये स्वच्छता अभियान
उत्साहात राबवण्यात आलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा
संदेश देण्यात आला.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत एक हजार ५३ आरोग्य तपासणी
शिबिरांच्या माध्यमातून
६७ हजार ९९८ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment