▼

Tuesday, 15 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 15 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन

·      न्यायव्यवस्था सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून लोक माहिती सेवेला प्रारंभ

·      मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये-आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांचं आवाहन

·      दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखड्याची मराठवाडा पाणी परिषदेची मागणी

आणि

·      दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

****

राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं आवाहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं सामावून घेतल्याचं शाह यांनी नमूद केलं. महाराष्ट्रासारखा मोठा बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठंही नसल्याचं शाह यांनी सांगितलं, ते म्हणाले...

बाईट- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

शहा यांच्या हस्ते यावेळी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

दरम्यान, वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष हा यंदाच्या भारतीय राजभाषा संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला, असं शाह यांनी सांगितलं.

****

सर्वोच्च न्यायालयाने 'लोक माहिती सेवा' सुरू करण्याची घोषणा केली आहे. न्यायव्यवस्था अधिक सर्वसमावेशक करणं आणि सामान्य नागरिकांना महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय समजून घेणं सुलभ करणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. काल जाहीर केलेल्या या सेवेअंतर्गत, महत्त्वाचे निर्णय आणि आदेशांचा सारांश सोप्या हिंदी भाषेत उपलब्ध करून दिला जाईल. याव्यतिरिक्त, सुमारे १५ ते ३० मिनिटांची श्राव्य तसंच दृकश्राव्य हिंदी बातमीपत्रंही न्यायालयाकडून प्रसारित केली जातील. जनतेच्या, विशेषतः दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं, सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं बोलत होते. आज आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचं, जरांगे यांनी स्पष्ट केलं. मात्र, आपल्याला एकट्यालाही मुंबईत उपोषणाची परवानगी नाकारल्यास सर्वांनी मुंबईकडे निघावे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान कालपासून पाणी आणि उपचार घेणे बंद केल्याने जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं आमच्या वर्ताहरानं सांगितलं.

****

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं काल प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशा सालियानचा ८ जून २०२० रोजी मुंबईत इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते. त्यानुसार, काल हा एफआयआर दाखल करण्यात आला.

****

दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखडा घोषीत करण्याची मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन परिषदेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं आहे. पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे आणि उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांनी ही माहिती दिली. कृती आराखडा घोषीत न झाल्यास, मराठवाड्यात जल जन आंदोलन उभारण्याचा इशारा परिषदेने दिला आहे.

****

प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार होती.

****

दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला काल जल्लोषात प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास बहुतांश घरी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली, त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीतकमी प्रदूषण होईल अशाप्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते बोलत होते.

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदा पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सार्वजनिक सजावटीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मुंबईचा लालबागच्या राजाची तसंच पुण्यामध्ये कसबा पेठेसह इतर मानाच्या गणपतींची ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात स्थापना करण्यात आली. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी काल सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली.

कोकणात सिंधुदूर्ग, रत्नागिरीत पारंपरिक लाकडी माटीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.

नागपुरात ध्वनिप्रदूषणाविरोधात काल मूक मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुख-समृद्धीसह भारताला विश्वगुरू करण्याची प्रार्थना केली.

छत्रपती संभाजीनगर इथंही ग्रामदैवत संस्थान गणपतीचं हजारो गणेश भक्तांनी काल दिवसभरात दर्शन घेतलं. शहरातल्या बाजारापेठांमध्ये चैतन्यमय वातावरण दिसून आले. घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांशीं पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी असल्याचं दिसून आलं.

डीजे आणि मोठ्या आवाजातील निक्षेपकांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर कोणीही नियमांची पळवाट शोधू नये, असा इशारा छत्रपती संभाजीनगर येथील पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. दोन बेस, दोन टॉपच्या नावाखाली डीजे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला.

मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आगमन झालं. बीडमध्ये २९२ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. हिंगोलीमध्ये नवसाला पावणाऱ्या श्री चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी काल मोठी गर्दी झाली.

जालना शहरासह जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्याचं आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीची काल सकाळी मंत्रोच्चार आणि सनई चौघड्यांच्या निनादात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

लातूर शहरातील विविध परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात भक्तीभावानं गणरायाचं आगमन झालं. शहरातील जुना मोंढा, वजीराबाद, आनंदनगर, आदी भागात भाविकांनी श्री गणेश मूर्ती आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

****

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांसाठी येत्या १६ सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव आंदोलन’ करण्यात येणार आह. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन आंदोलनाची माहिती देण्यात येत आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. उद्या बुधवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक होणार असून  त्यानंतर पंचनाम्यांचे आदेश निर्गमित होतील अशी माहिती त्यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगरनजीक पिंप्रीराजा इथं गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्यानं दोन शेतकरी ठार तर अकरा जण जखमी झाले. जखमींमध्ये सात वर्षाच्या बालकासह बँड पथकातील सदस्यांचा  समावेश आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment