▼

Friday, 4 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      अन्न आणि औषध प्रशासनाकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी, सर्वसमावेशक आदेश जारी

·      महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन

·      गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

·      हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याचं सरकारचं उपोषणकर्त्यांना आश्वासन, उद्यापर्यंत कुणबी नोंदींच्या याद्या गावोगावी लागणार

आणि

·      छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात आज पावसाची शक्यता

****

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी, सर्वसमावेशक आदेश, अन्न आणि औषध प्रशासनानं काल जारी केला. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आदेशानुसार विभागाचे अधिकारी राज्यभरात अन्नछत्रं, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, आणि याच वेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो, तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं मुंढे यांनी सांगितलं.

उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, आदी जास्त जोखमीच्या ११ खाद्यपदार्थांसाठी तपासणीसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून देण्यात आली आहे. मात्र ही तपासणी करताना कोणत्याही उपहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं.

****

महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते काल बोलत होते. देशात सहा कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या साडे तीन कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले.

बाईट - केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान

****

गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात सर्वत्र हा उत्सव शंभर टक्के पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिशा अभियानातल्या विशेष शिक्षकांचा सन्मान केला. २१ हजारांहून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी विशेष वॉर रूम उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. 

****

राज्य विधीमंडळात शाश्वत विकासावर चर्चा घडवून आणण्याची गरज आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नियोजित जन आंदोलनाबाबत काल छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या सादरीकरणात बोलतांना ठाकरे म्हणाले...

बाईट - आमदार आदित्य ठाकरे

 

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्यावर सविस्तर सादरीकरण केलं. दरम्यान, या जनआंदोलनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठही जिल्ह्यांमध्ये स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे.

****

महाराष्ट्रातली रेल्वेची प्रस्तावित पूर्व-पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका लवकरच राष्ट्राला समर्पित केली जाणार असल्याचं, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी विशेष रेल्वेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. ही मार्गिका विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल, जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आज साजरा होत आहे. या निमित्ताने देशभरातल्या श्रीकृष्णाच्या विविध मंदिरांवर रोषणाई आणि सुशोभीकरण करण्यात आलं असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांचा समावेश होता. गावागावामध्ये कुणबी नोंदींच्या याद्या लावण्याच्या मागणीला शिष्टमंडळानं होकार देऊन, हे काम उद्या पाच सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करता येतील, असंही सरकारच्या वतीने सांगण्यात आलं.

त्यामुळे मराठा समाजबांधवांनी उद्यापासून अर्ज करावेत, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. प्रमाणपत्र वाटपात सुलभता यावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला नोडल ऑफिसर नेमला जाईल, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

**

जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ काल विविध ठिकाणी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जालना जिल्ह्यात बदनापूर, मंठा, जाफ्राबाद, भोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली. तर काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदनं सादर केली.

लातूर शहरात मराठा समाज बांधवांनी दुचाकी फेरी काढून व्यापारी आणि नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं.

नांदेड जिल्ह्यात नांदेड-नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

हिंगोली जिल्ह्यात मराठा संघटनांच्यावतीने काल बाजरपेठा बंद ठेवण्यात आल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुरुंदा इथं वसमत तहसीलवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. सरमकुंडी फाटा इथं आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको केल्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.

****

राज्यातल्या निवडक जिल्ह्यांतल्या गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्प राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक काल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

****

जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने काल औद्योगिक परिषद घेण्यात आली. जालना जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीकडून केवळ भूखंड विक्रीवर नव्हे, तर पायाभूत सुविधा, आवश्यक सेवा आणि उद्योगपूरक वातावरण निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचं एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितलं. लॉयड्स मेटल्सने नजीकच्या काळात दोन हजार कोटी आणि दीर्घकालीन सहा हजार कोटी, अशी एकूण आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा यावेळी केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने विनोदराय इंजिनिअरिंग आणि रूट पाइप्स यांच्यासोबत गॅसपुरवठ्यासाठी सामंजस्य करार केले.

****

धुळे जिल्ह्यात मध्यप्रदेश सीमेलगतच्या दुर्गम भागात पोलीस आणि वनविभागाच्या पथकांनी काल संयुक्त कारवाई करत गांजाची शेती उध्वस्त केली. शेतात लागवड केलेला सात लाख ४३ हजार रुपयांचा गांजा प्रशासनाने जागेवरच नष्ट केला.

****

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतने कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा २१-१८, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सात्विक चिराग जोडीने फ्रान्सच्या जोडीवर २१-१७, २४-२२, २१-९ असा विजय मिळवला. आज होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या खेळाडूशी तर सात्विक-चिराग जोडीचा सामना डेन्मार्कच्या जोडीशी होणार आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरी तसंच मिश्र दुहेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

आशिया चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत काल दुबईत झालेल्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा १३७ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारतीय महिला संघ स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पोहोचला आहे.

****

हवामान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणीसह नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागात आज जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

****

No comments:

Post a Comment