▼

Wednesday, 9 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

फिनटेकमध्ये मुंबई ही देशाची राजधानी असून, या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी प्रगती केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये आज एका सत्रात सहभागी झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. युपीआय हे जगात सर्वात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणारं प्लॅटफॉर्म बनलं असून, त्याद्वारे भारत हा जगातला सर्वात मोठा डिजिटल व्यवहार करणारा देश झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्रात होत असलेल्या कामाबाबात मुख्यमंत्री म्हणाले..

बाईट -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसेवेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त १७ सप्टेंबरपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी सात ऑक्टोबर रोजी लोकसेवेची २५ वर्षे पूर्ण करतील. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरांच्या आयोजनाने होणार आहे. सात ऑक्टोबरला मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा ज्योती कलश यात्रा काढण्यात येणार असून, सेवा मेरा योगदान हा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत लोकसहभागातून आयोजित केला जाणार असल्याचं नवीन यांनी सांगितलं. 

****

न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या शनिवारी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती.

****

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवव्या राष्ट्रीय पोषण महिन्याला आज सुरुवात झाली. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी, ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातली विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधलं ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातल्या विकासासाठी शिक्षण, तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची दहा वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे.

****

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱया नंदुरबारमधल्या बाल शहिदांना आज ८४ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱयाने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणाऱया बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा,धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा  यांच्यावर इंग्रजांनी बेछुट गोळीबार केला होता. या शहिदांना हुतात्मा चौकात पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम २०२६ च्या मसुद्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने सादर केलेल्या मसुद्यावर आतापर्यंत ११ हजार ४०० हून अधिक हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील पथकर नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. तसंच अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने येत्या शनिवारी १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. धनादेश अनादर, बँक आणि कर्ज वसुली प्रकरणं, कामगार वाद, वीज आणि पाणी बिलाचे वाद, वैवाहिक आणि कौटुंबिक वाद, त्याचबरोबर इतर दिवाणी आणि तडजोडयोग्य फौजदारी प्रकरणांचा या लोकअदालतीमध्ये निपटारा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही लोकअदालत होणार आहे.

****

No comments:

Post a Comment