Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
ब्रिक्स
शिखर परिषदेचा समारोप;पुढच्या अध्यक्षपदाची सूत्रे चीनकडे सुपूर्द
·
२०२९
पूर्वी २१ राज्यांमध्ये समान नागरी कायदा आणण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा
·
‘स्वच्छ वायू
सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर महापालिका देशात १६ व्या क्रमांकावर
·
मनोज
जरांगे यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी पोलिस प्रशासनाने नाकारली
·
दहा
दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ
आणि
·
क्रिकेट
तसंच हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य
****
भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आयोजित १८ वी ब्रिक्स
शिखर परिषद २०२६ ची काल यशस्वी सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत जागतिक
अर्थव्यवस्था,
तंत्रज्ञान आणि सहकार्यावर महत्त्वाच्या चर्चा झाल्या.
ब्रिक्स परिषदेच्या या पुढच्या अध्यक्षपदाची सूत्रे चीनकडे सोपवण्यात आली. या
परिषदेत लवचिकता,
नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या
सत्राचा समारोप करताना पंतप्रधानांनी ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली
जाहीरनामा,
सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट
दिशा देईल,
अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले...
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
२०२९च्या आधी भाजपा-एनडीए शासित २१ राज्यांमध्ये समान नागरी
कायदा कायदा आणू,
अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ते काल
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत बोलतांना शाह म्हणाले...
बाईट – अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाच्या
रौप्यमहोत्सवानिमित्त भाजपच्या वतीने आयोजित सेवा संकल्प अभियानाबाबतही शाह यांनी
माहिती दिली.
मुंबईत ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीच्या कार्यक्रमातही शहा
यांनी मार्गदर्शन केलं. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन
करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम करता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण असल्याचं
त्यांनी नमूद केलं. इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यावेळी उपस्थित होते. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं
जतन आणि संवर्धन होत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, तर
एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य
असल्याचं मत,
शिंदे यांनी व्यक्त केलं.
**
दरम्यान, मुंबईत ५२ व्या इंडिया जेम्स अँड
ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६ सोहळ्यातही शाह यांनी काल मार्गदर्शन केलं. प्रयोगशाळेत
विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिने
उत्पादन, ब्रँडिंग,
शोरूम आणि जागतिक विक्री व्यवस्थेपर्यंतची संपूर्ण
मूल्यसाखळी भारतात उभारावी असं आवाहन शाह यांनी केलं.
****
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल
मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ मध्ये १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या
असलेल्या ४८ शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका देशात १६ वा
क्रमांक आला आहे. गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरचा ३४ वा क्रमांक होता.
महानगरपालिकेमार्फत सातत्यानं राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, प्रभावी
कचरा व्यवस्थापन,
धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक
वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेल्या जनजागृतीचं फलित असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांना मुंबई
पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून या
निर्णयाबाबतचं पत्र जारी करण्यात आलं. आजपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. अशा परिस्थितीत आंदोलन
केल्यास सार्वजनिक सुरक्षेची चिंता निर्माण होऊ शकते, असं
पोलिस प्रशासनाने या पत्रात म्हटल्याचं वृत्त आहे. जरांगे यांनी मात्र, मुंबईला
जाण्याचा निर्धार कायम असल्याचं म्हटलं आहे.
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यासह
छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाभरात गणेश चतुर्थी निमित्त बाजारपेठा गजबजल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं विविध भागांमध्ये गणेश मूर्तींसह पूजा साहित्य आणि मखर
सजावटीची विक्री केंद्र सजली आहेत. यावेळी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, आणि
इतर साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पोलिस दलाकडून
गणेशोत्सवाच्या काळात चोख बंदोबस्त ठेवला जात असून, शहराच्या विविध
भागातून पथसंचलन करण्यात येत आहे.
****
राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी
महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील
वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता. यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा
राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय
तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे.
****
राज्यात स्वयंसहायता समूहातील महिलांचं काम उल्लेखनीय असून
या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं
सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती
संभाजीनगर इथं,
उमेद स्वयंसहायता समूह, ग्रामीण भागातील महिलांनी
तयार केलेल्या गणपती मूर्तींची विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गणपती
महोत्सवात ते बोलत होते.
****
बीड शहरातील ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी उत्कृष्ट देखावा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेत सहभागी मंडळांनी नाव नोंदणी करावी, असं आवाहन डॉ. योगेश
क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि
सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यासाठी
गांधी चौक पोलिस ठाण्याच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढण्यात
आला.
****
नांदेडच्या श्री गुरुग्रंथ साहिबजी महाराज यांच्या प्रकाश
पर्वानिमित्त काल महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात एक हजार १५७
नागरिकांना विविध मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ देण्यात आला. यात पुढील उपचारांची
आवश्यकता असलेल्या ४३ रुग्णांना उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आलं.
****
नांदेड इथं काल अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या
समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं
निवेदन सादर करण्यात आलं.
****
यंदाचा बी.रघुनाथ पुरस्कार लेखक व्यंकटेश सोळंके यांना 'अरसड' या
कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या
कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक उत्तम बावस्कर यांच्याहस्ते सोळंके यांना हा पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं.
****
बीडच्या गेवराई इथं अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त
आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत शारदा प्रतिष्ठानच्या वतीनं काल दिव्यांगांना मोफत
कृत्रिम हात आणि पाय बसवून देण्यात आले. गेवराईचं शारदा प्रतिष्ठान, शारदा
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि साधू वासवानी मिशन, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला तसंच पुरुष कनिष्ठगट
संघांनी विजेतेपद पटकावलं आहे. महिलांच्या संघाने काल अटीतटीच्या अंतिम सामन्यात
यजमान चीनचा १-० असा पराभव करून, सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं.
सानिका चंद्रकांत माने हिने १७ व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर
संघाला ही कामगिरी करता आली.
पुरुष संघानेही काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण
कोरियाचा ४-१ असा पराभव करत सलग चौथ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
****
आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात
श्रीलंकेवर ७२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघानं दिलेल्या १८६ धावांचं आव्हान
गाठतांना श्रीलंकेचा संघ १११ धावांतच सर्वबाद झाला.
****
भारत-अफगाणिस्तान यांच्यातल्या टी-ट्वेंटी मालिकेच्या
पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानने
दिलेलं १५६ धावांचं आव्हान भारतानं १३ षटकं ४ चेंडूत पूर्ण केलं.
****
छत्रपती संभाजीनगरचे धावपटू प्रसाद कुलकर्णी यांनी भारतातील
सर्वात अवघड अशी लडाख मॅरेथॉन अवघ्या दीड तासात पूर्ण केली.
काल लेह इथं झालेल्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी ११ किलोमीटरचं
अंतर दिलेल्या दोन तासांच्या आत पूर्ण करत पदक मिळवलं.
****
लातूर शहर महानगरपालिकेच्या ९०% शास्ती माफी योजना तसंच लोक
अदालतीला मिळालेला प्रतिसाद विचारात घेवून शास्ती माफी योजनेस काल रविवारी एका
दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. काल दिवसभरात ३०० पेक्षा जास्त थकबाकीदार
मालमत्ताधारकांनी तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कर भरणा केल्याचं
महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकण, आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य
महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान
विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस
पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment