▼

Thursday, 17 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      ७९ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आठही जिल्ह्यात ध्वजवंदना, विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      अवर्षणामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य, संभाजीनगरमधील मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      बीड - पुणे थेट रेल्वे सेवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू

आणि

·      सेमीकॉन २०२६ परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते उद्घाटन

****

आज ७९ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यात आलं. मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतिस्तंभ परिसरात आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बाईट - मुख्यमंत्री फडणवीस

 

मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला; पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही हा संकल्प आम्ही केला आहे. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगाने वाटचाल सुरू आहे. कृष्णा खोऱ्यातलं पाणी भीमा खोऱ्यातून अतिरिक्त  ३० टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणायचं काम आता सुरू करत आहोत. यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल. तसेच गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उल्हास खोऱ्यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. अंदाजे ७० टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सात वर्षात टप्प्याटप्प्यानं हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची शासन दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत करेल, असं आश्वासन सावे यांनी यावेळी दिलं. जिल्ह्यात ६४ हजार २७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत ४८८ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना प्रशासनातर्फे अभिवादन करुन स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आलं. यासोबतच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.

****

धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री नरहरी झीरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

****

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त, सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून नांदेडमध्ये महापौर कविता मुळे यांच्या संकल्पनेतून, 'स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड, या मोहिमेला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेचं कौतुक करत मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नांदेडची ओळख असून स्वच्छतेतही सर्वांनी एकजुटीनं सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री सावे यांनी यावेळी केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि आमदार अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

****

बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला आज बीड रेल्वेस्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवास करता येईल, असा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. यावेळी बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे तसंच धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ इथल्या विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन २०२६ परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यामध्ये उद्योगजगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून, उद्योगजगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या १ लाख विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्त्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी ६ स्तंभांच्या आधारे काम करू, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २५ वर्षं पूर्ण होत असून, त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****

आज घरोघरी ज्येष्ठा गौरींचं मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात येत आहे. घरोघरी गौरींच्या आगमनासाठी घरांची आकर्षक सजावट केली. गौरी आवाहन, पूजनासाठी सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंतची मुहूर्त वेळ आहे.

****

१२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिरासाठी दोन टप्प्यात एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीनं मान्यता दिली आहे. या माध्यमातून मंदिर तसंच परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासह विविध विकासकामांवर भर देणार असल्याचं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हिंगोलीतल्या हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

****

No comments:

Post a Comment