▼

Saturday, 19 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सरकारी सेवेतल्या युवकांनी विकसित भारताच्या प्रवासाला बळ द्यावं-२० व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं आवाहन

·      छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा कृषीमंत्र्यांकडून आढावा-शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन

·      जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा

आणि

·      बीड-पुणे रेल्वेसेवा येत्या २३ सप्टेंबरपासून नियमित सुरू होणार

****

सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांनी, विकसित भारताकडे सुरू असलेल्या प्रवासाला बळ देणारे निर्णय घ्यावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज २० व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात विविध ४५ ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान केली.

प्रशासनामध्ये काम करत असतांना सर्व कार्यकौशल्य आत्मसात करून आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यास त्याला जनता आणि आपले सहकारी सुद्धा लक्षात ठेवतात, त्यामुळे जनतेप्रती संवेदनशीलता ठेवून काम करण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं. तर तरुणांनी विविध क्षेत्रात काम करताना देशहित केंद्रस्थानी मानून स्वतःला झोकून द्यावं, असं आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

****

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक तसंच अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश भरणे यांनी दिले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, यांच्यासह विभागातले बहुतांश लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. 

 

मराठवाड्यातील ७६ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस तसंच पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना भरणे यांनी यंत्रणेला दिली. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागण्याची तसंच त्यांच्या अडचणी समजून घेण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली.

 

पिण्याचे पाणी, चारा तसंच अखंडित वीजपुरवठ्याचं योग्य नियोजन करावं, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावी तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे निर्देशही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 

दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती तसंच अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असं सांगत, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी केली. लोकप्रतिनिधींनी विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासही भरणे यांनी सांगितलं.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलतांना, सध्या सुरू झालेलं वीज भारनियमन तातडीनं मागे घेणार असल्याचं, जाहीर केलं.

दरम्यान, या बैठकीनंतर भरणे यांनी नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली.

****

हिंगोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली यादी बनावट आहे. शेतकरी आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसंच त्या कोणालाही पाठवू नयेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणच्या श्रोत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. या सर्वांमधून प्रातिनिधिक स्वरुपात, छत्रपती संभाजीनगर इथले प्राध्यापक शरद भोगले यांचा शुभेच्छा संदेश...

बाईट -  प्राध्यापक शरद भोगले

****

ओबीसींसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम असावा आणि जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी ‘चलो दिल्ली’ आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन ऑक्टोबरला तालुकास्तरावर सत्याग्रह, तर २५ ऑक्टोबरला जिल्हास्तरावर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरही वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

****

बीड-पुणे रेल्वेसेवा येत्या २३ सप्टेंबरपासून नियमित सुरू होत असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. बीडहून रेल्वे रात्री साडे नऊ वाजता सुटून पुणे जंक्शन इथं सकाळी पाच वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री पावणे अकरा वाजता सुटून बीडला सकाळी सहा वाजता पोहोचेल, असं बीड रेल्वे स्थानक प्रशासनानं जाहीर केलं आहे. प्रवाशांनी विनातिकीट प्रवेश करू नये, धावत्या गाडीत चढू नये, रुळांवर जाऊ नये, तसंच रेल्वे संपत्तीचं नुकसान करणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास रेल्वे संरक्षण दल, लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान' अंतर्गत परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या सुषमा सातपुते यांनी प्रगती साधली आहे. आपल्या या प्रवासाबद्दल सुषमा सातपुते यांनी आकाशवाणीशी बोलतांना अधिक माहिती दिली....

बाईट -  सुषमा सातपुते

****

राज्यातील शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती परवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता समिती विद्यार्थी, परीक्षार्थी आणि संबंधित घटकांना भेटून त्यांची मते जाणून घेणार आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेनं परिषदेच्या कार्यालयासाठी बांधलेल्या नवीन इमारतीचं आणि यात निर्माण केलेल्या मधुकरराव मुळे सभागृहाचं उद्घाटन पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात उद्या सायंकाळी साडे पाच वाजता हा सोहळा होणार आहे.

****

हवामान

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी २२ सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment