Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· राज्यात दुष्काळाचा पहिला शासन आदेश उद्या जारी करणार-अमरावती
इथं मुख्यमंत्र्यांची घोषणा;वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या
बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडून पिकांची पाहणी
· दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं विशेष
अधिवेशन घ्यावं-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
· कमी पाऊस झालेल्या भागात मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा
आढावा घेणार
· केंद्र सरकारकडून विविध खाद्य तेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात
कपात
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज एक रौप्य आणि दोन कांस्य
पदकाची कमाई
****
राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश उद्या जारी करणार असल्याची
घोषणा,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज अमरावती
विभागात वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अमरावती विमानतळावर
माध्यमांशी बोलत होते. सकृतदर्शनी दुष्काळग्रस्त दिसत असलेल्या भागाचा या पहिल्या आदेशात
समावेश असेल,
राज्यातला एखादा दुष्काळग्रस्त भाग यातून सुटला तर, पुढच्या आदेशात त्याचा समावेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
त्यापूर्वी वाशिम जिल्ह्यात कारंजा, मंगरुळपीर
आणि मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी पावसाअभावी वाळलेल्या
पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून
मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध पाणी प्राधान्याने पिण्यासाठी आणि त्यानंतर सिंचनासाठी राखीव
ठेवणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अवर्षणामुळे झालेलं नुकसान मोठं आहे, मात्र शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, शासन
शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल, यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असं
मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं.
****
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या
दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी मदत
केली जाईल,
अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज
थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. सेलू तालुक्यातील
कुंडी,
पाथरी तालुक्यातील हदगाव, मानवत
तालुक्यातील सारोळी आणि गंगाखेड तालुक्यातील अकोली इथं, बोर्डीकर
यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित
राहणार नाही,
अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व
महसूल अधिकारी,
कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध
घातले आहेत. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा कर्डिले
यांनी दिला आहे.
****
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड इथं आमदार रोहित पवार यांच्या
नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने विशेष आर्थिक
पॅकेज जाहीर करावे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत द्यावी. पीक विम्याची नुकसानभरपाई
तातडीने द्यावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
राज्यातल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं
तातडीनं किमान २ ते ३ दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं
उचलली जात आहेत,
याची माहिती द्यावी, अशी
मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत
बोलत होते. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागांत शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रं
सुरू करावीत,
असं आवाहन त्यांनी केलं. मराठवाड्यासह दुष्काळाचा मोठा प्रभाव
असलेल्या तीन महसूल विभागात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची सूचनाही ठाकरे यांनी केली. ते
म्हणाले –
बाईट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
****
कमी पाऊस झालेल्या भागात उपाययोजना निश्चित करण्यासाठी नेमलेली
११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्याबरोबर चर्चा करुन विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना
मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान
करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची ११ पदं निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी
दिली. तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील महसुली सेवा अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी
४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये आणि चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा
निर्णय घेण्यात आल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. यात मराठवाड्यातल्या छत्रपती
संभाजीनगर,
नांदेड, लातूर, परभणी,
जालना आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
नीट - पीजी २०२६ परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. नॅशनल बोर्ड
ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस च्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल
पाहता येईल. ३० ऑगस्ट २०२६ रोजी देशभरात घेण्यात आलेली ही परीक्षा एकूण २ लाख ६५ हजार
९६० उमेदवारांनी दिली होती.
****
केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्य तेलांवरच्या मूलभूत आयात
शुल्कात कपात केली आहे, त्यामुळं तेलाच्या किंमती कमी
होण्याची शक्यता आहे. कच्चा सूर्यफुल तेलावरचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून पूर्णपणे
रद्द करण्यात आलं असून, कच्च्या सोयाबीन तेलावर तसंच
कच्च्या पाम तेलावर आता १० ऐवजी ५ टक्के मूलभूत आयात शुल्क लागेल. आयात शुल्कातील या
दर कपातीचा लाभ सर्व ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय
ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत.
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाची उद्या अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे.
मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी गिरगाव चौपाटी परिसरात वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा बृहन्मुंबई
महानगरपालिकेनं समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. तसंच महानगरपालिकेनं तयार केलेल्या
कृत्रिम तलावांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुण्यात उद्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे १० हजाराहून जास्त जवान तैनात करण्यात आले
आहेत. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ विश्लेषण आणि चेहरा ओळख प्रणालीचा वापर करण्यात
येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथंही महापालिकेने विसर्जन विहिरींची स्वच्छता
आणि इतर तयारी केली असून, पोलिस प्रशासनानं विसर्जन सोहळ्यावर
लक्ष ठेवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरातल्या वाहतुक व्यवस्थेतही बदल करण्यात
आला आहे,
नागरिकांनी याची दखल घेण्याचं आवाहन पोलिस प्रशासनानं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगर परिषदेतर्फे गणेश विसर्जनासाठी
पाच कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी चार हौद स्थिर असून, एक फिरता हौद शहरातील विविध भागांत नागरिकांच्या सोयीसाठी फिरणार आहे. नागरिकांनी
या हौदांचा विसर्जनाची वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे
****
परभणी जिल्ह्यात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक हजार २५५ आरोग्य शिबिरात ७८ हजार ५३ रुग्णांची
आरोग्य तपासणी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद पंचायत समिती कार्यालयात
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आज आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात १५४
महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसंच पात्र लाभार्थींना मोफत औषधोपचार आणि औषधांचे
वितरण करण्यात आलं.
****
महावितरणतर्फे ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात
आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाच्या विशेष सेवा कक्षाचं
आज ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या अभियानात
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज
एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली. वुशूमध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक पटकावलं.
अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतीलं
रोशिबिनाचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग
आणि सलमान खान यांनी कांस्यपदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला-सिंड्रेला दास
आणि यशस्विनी घोरपडे-दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
नेमबाजीतील मिश्र सांघिक स्कीट प्रकारात अनंत जीत सिंग नारुका
आणि परिनाज धालीवाल यांनी कांस्यपदक जिंकले. ‘मिक्स्ड स्कीट टीम’ प्रकारातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक आहे. पुरुष कबड्डीमध्ये
भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला ३७ - २१ असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश
केला आहे. या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी
संघानं देखील इराणच्या संघाचा ३७-२३ असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपानबरोबर
होणार आहे.
भारत या स्पर्धेत भारत १६ पदकांची कमाई करून पदकतालिकेत १३व्या
स्थानावर आहे. यात १ सुवर्ण, ६ रजत आणि ९ कांस्य पदकांचा
समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment