▼

Tuesday, 29 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षा दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर दोन मध्ये लाभ देण्यात येणार

·      जर्मनीच्या ऑडी कारची छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाज नीरु धांडा हिचा सुवर्णवेध-महिलांच्या रिले संघालाही सुवर्णपदक

****

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयोमर्यादेत चार वर्षांची सवलत दिली जाईल, असं सांगत, गरज पडल्यास अग्निवीरांसाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

दुष्काळाच्या पहिल्या यादीत नसलेल्या तालुक्यांना ट्रिगर दोन मध्ये लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्य वैरण विकास धोरणही मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. या धोरणामुळे पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार असून दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे.

 

छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापनेला आणि त्यासाठीच्या पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली.

 

‘महाराष्ट्र कारागृहे सुधारसेवा अधिनियम, २०२५’ मध्ये सुधारणा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा सुधारित आकृतीबंध, तसंच ‘महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण – २०२४’ मध्ये सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी चारशेपेक्षा जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यातून किमान पन्नास हजार जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था- सारथीला १२२ कोटी ३४ लाख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. सारथीला मिळालेल्या या निधीतून राज्यात मराठा समाजातल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आठ वसतिगृहांच्या उभारणीचं काम पूर्ण होत असून, पुढच्या शैक्षणिक वर्षापासून ही वसतिगृहं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील, अशा दृष्टीनं नियोजन करण्यात येत असल्याचं विखे यांनी सांगितलं.

****

अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये मातंग समाजासाठी स्वतंत्र उपवर्गीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीनं आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोर्चा काढण्यात आला. ही मागणी मान्य करण्यासाठी शासनानं सकारात्मक पावलं उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं समाजबांधव सहभागी झाले होते.

****

वाहनांसंदर्भात जारी झालेल्या ई चालानच्या थकित रकमेच्या वसुलीत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी, थकित चालान संबंधितांच्या वीजबिलांशी जोडण्याचा विचार करावा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. याशिवाय, थकित चालानच्या रकमेची वसुली होईलपर्यंत वाहन नोंदणीचं नूतनीकरण, मालकी हस्तांतरण, फिटनेस आणि पीयूसी प्रमाणपत्र तसंच लायसन्सच्या नूतनीकरणावर निर्बंध घातले जावेत, अशी सूचनाही न्यायालयानं केली आहे. परिवहन पोर्टलवर चालान थकित असणाऱ्या वाहनांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आणि सातत्यानं थकबाकी ठेवण्याच्या स्थितीत वाहनं जप्त करण्याच्या शक्यतेवरही सरकारांनी विचार करावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. आयोग घेत असलेले निर्णय सर्वसहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल.

****

निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांसंदर्भातल्या कार्यवाहीविरोधात येत्या चार ऑक्टोबरला मुंबईत एक संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. हा मोर्चा अराजकीय असेल आणि कुठल्याही पक्षाचा नाही तर देशाचा तिरंगा ध्वज यावेळी हातात असेल, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगानं दिलेली १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत अत्यंत अपुरी असून, ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना लिहिलेल्या एका पत्रात, या प्रक्रियेत सध्या येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि हरकतींची मोठी संख्या पाहता अशी मुदतवाढ गरजेची असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे.

****

जर्मनीची नामांकित लक्झरी कार कंपनी ऑडीनं आपल्या बहुप्रतीक्षित ऑल - न्यू ऑडी क्यू -३ या नव्या मॉडेलची छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा प्रकल्पात बांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. शेंद्रा औद्योगिक क्षेत्रातल्या स्कोडा कंपनीच्या परिसरात या अत्याधुनिक लक्झरी कारची जुळणी सुरू झाली आहे. ऑडीच्या प्रीमियम एसयूव्ही श्रेणीतलं महत्त्वाचं मॉडेल असलेली ही एसयूव्ही येत्या १६ ऑक्टोबरला भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याची माहिती शेंद्रा एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी दिली.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने आणखी दोन सुवर्ण पदकं पटकावली. नेमबाजीत नीरु धांडा हिनं महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. त्याचबरोबर महिलांच्या ट्रॅप सांघिक स्पर्धेत नीरु धांडा, आशिमा अहलावत आणि मनिषा कीर यांच्या संघाने आज रौप्य पदकाची देखील कमाई केली. मुष्टीयुद्धात नरेंद्र बेरवालने ९० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं, तर परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत गुलवीरसिंह याने कांस्यपदक पटकावलं. रुद्रांक्ष पाटील पाठोपाठ या स्पर्धेत तीन पदकं मिळवणारा गुलवीरसिंह हा दुसरा खेळाडू ठरला आहे. चारशे मीटर रिले स्पर्धेत महिलांच्या संघालाही सुवर्णपदक मिळालं. तर याच प्रकारात पुरुष संघाने कांस्यपदक पटकावलं.

या स्पर्धेत भारत एकूण बावन पदकांसह आता दहाव्या स्थानावर पोहचला आहे. या पदकांमध्ये सहा सुवर्ण, एकवीस रौप्य आणि पंचवीस कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या पीक कापणी प्रयोगासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी प्रयोग पूर्ण होईपर्यंत पीक कापणी, काढणी किंवा नांगरणी करू नये आणि नियोजित पीक कापणी प्रयोगास सहकार्य करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या पीक कापणी प्रयोगांवर परिणाम होऊ शकतो, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

वीज महावितरण कंपनीच्या माजलगाव आणि तेलगाव उपविभागातील रिक्त पदं तातडीने भरण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. माजलगाव इथं महावितरणचं स्वतंत्र विभाग कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन कार्यवाही करण्याची मागणीही आमदार सोळंके यांनी केली.

****

लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या प्रलयंकारी भूकंपाला उद्या ३३ वर्ष होत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे चार वाजेच्या सुमारास झालेल्या या साडे सहा रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे या परिसरातल्या ५० हून अधिक गावातली हजारो घरं जमीनदोस्त होऊन, मोठ्या प्रमाणावर जीवीत तसंच वित्त हानी झाली होती.

****

No comments:

Post a Comment