Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01
October 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
यूपीएससीच्या शंभर वर्षांच्या प्रवासात पिढ्या, सरकारे, तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम बदलले आहेत, परंतु या संस्थेवरील लोकांचा विश्वास पूर्वीसारखाच अचल
आणि दृढ राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज
केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. केवळ
सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे, तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन पुढे येतात, अशा तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी
भर दिला. प्रशासकीत सेवेतल्या भरती प्रक्रियेत कालानुरुप सुधारणा केल्या पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यूपीएससीच्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी नियुक्त्यांची
संख्या वाढली असून, भरती प्रक्रियेतील पारदर्शकताही
सुधारली असल्याचं, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र
सिंह यावेळी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ वर्षांच्या काळात यूपीएससीमार्फत
सुमारे ६५ हजार नियुक्त्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी पंतप्रधान मोदींनी यूपीएससीचं शताब्दी स्मृती नाणं, एक विशेष टपाल तिकीट आणि एका पुस्तकाचं प्रकाशन केलं.
****
बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची टंचाई
निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातून इतर
जिल्ह्यांत सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. जिल्ह्यात १९ हजार
४९१ मेट्रिक टन चारा शिल्लक असून, हा साठा सुमारे ६० दिवस पुरेल एवढाच आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर
कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातही पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची
शक्यता आहे. चाऱ्याअभावी दूध उत्पादनावर परिणाम होण्यासोबतच पशुधन विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर
येऊ शकते. या पार्श्वभूमीवर युवापर्व ग्रामविकास फाउंडेशनने दुष्काळग्रस्त भागातल्या
जनावरांसाठी संघटितपणे चारा निर्मिती अभियान हाती घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना
दिला आहे. या अभियानांतर्गत विहीर किंवा बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सुविधा असलेल्या
शेतकऱ्यांकडून दोन एकर क्षेत्रात हिरव्या चाऱ्याची लागवड करून घेण्याचं नियोजन आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत अन्न
आणि औषध प्रशासनने कारवाई करत गोदामामध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेलं २ लाख ५१
हजार किलो सुटं सोयाबीन तेल जप्त केलं. या तेलाची किंमत सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपये
इतकी आहे. ए.एम. ऑईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अन्न पदार्थाच्या साठवणुकीचा, उत्पादनाचा किंवा घाऊक विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचं
प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन
मध्ये भारताने आज रौप्य पदक जिंकलं. पुरुष गटातल्या 'स्किफ' शर्यतीत मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल यांनी या
प्रकारातलं हे पहिलं पदक पटकावलं. आतापर्यंत झालेल्या नऊ शर्यतींमध्ये फ्रान्सिस आणि
नोबल यांनी सातत्यपूर्ण कामगिरीचं प्रदर्शन केलं, त्यांनी एकूण २३ गुण मिळवले आणि एका शर्यतीत विजयही संपादन केला, ज्यामुळे त्यांचं रौप्यपदक निश्चित झालं.
स्क्वॅशमध्ये भारतीय महिला संघाने आज कांस्य पदक जिंकलं.
उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाला हाँगकाँग कडून पराभव पत्करावा लागला. पुरुष हॉकी मध्ये
उपान्त्य फेरीत आज भारत - पाकिस्तान सामना होईल.
पुरुष क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश
केला. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव
केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात सात बाद १६९ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल
आलेला श्रीलंकेचा संघ दहाव्या षटकात ४५ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून इशान किशनने
नाबाद ८० धावा केल्या.
कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेशने मंगोलियाच्या
खेळाडुचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. महिला कुस्तीमध्ये ६२ किलो वजनी गटात मानसी अहलावत
आज कांस्य पदकासाठी खेळणार आहे.
या स्पर्धेत भारत सध्या ६३ पदकांसह आठव्या स्थानावर आहे.
यामध्ये दहा सुवर्ण, २२ रौप्य आणि ३१ कांस्य
पदकांचा समावेश आहे.
****
यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात
देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ८७ टक्के तर राज्यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस पडल्याची
माहिती भारतीय हवामान विभागाने काल दिली. नाशिक आणि पालघर हे दोन जिल्हे वगळता राज्यातल्या
इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment