▼

Monday, 5 October 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 October 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं. त्यांच्या समवेत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. सन्मानरक्षक तुकडीकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते.

पार्मेलिन यांनी यावेळी बोलताना, भारताचा दौरा दोन्ही देशांमधली दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचं सांगितलं. भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराला एक वर्ष पूर्ण होत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता तसेच संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांतल्या सहकार्यावर चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

पार्मेलिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत-युरोपीय संघ व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सात ऑक्टोबर रोजी आयोजित दुसऱ्या भारत-ईएफटीए समृद्धी परिषदेतही ते सहभागी होणार आहेत. स्वित्झर्लंड हा भारताचा महत्त्वाचा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार असून, दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या भेटीमुळे नियमित उच्चस्तरीय संवादाच्या माध्यमातून भारत-स्वित्झर्लंड द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यास आणि परस्पर हिताच्या नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक सखोल होण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

****

देशाला विकसित भारत म्हणून साकारण्यासाठी प्रत्येक उद्योगाला विकासाची संधी देणाऱ्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आवश्यक असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष लेखातून म्हटलं आहे. देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या १२ वर्षांत सातत्याने प्रयत्न केले आहेत. २०१७ मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अप्रत्यक्ष कररचनेला एक सामायिक राष्ट्रीय संरचना मिळाली. पुढील पिढीतील जीएसटी सुधारणांनी या प्रक्रियेला आणखी बळ देत अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी नमूद केलं. जीएसटीच्या नऊ वर्षांच्या प्रवासात राज्यांना आणि करदात्यांना विविध सकारात्मक सुधारणांचा अनुभव आला आहे. ऑगस्टअखेर केंद्र आणि राज्यांच्या अखत्यारीतील जीएसटी नोंदणीची संख्या सुमारे १ कोटी ७१ लाखांवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात जवळपास १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, पुढील पिढीची जीएसटी प्रणाली करांचे दर कमी करणं, कर आकारणीची प्रक्रिया सुलभ करणं आणि कर भरणं अधिक सोपं करणं या उद्देशांवर आधारित असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. प्रक्रियात्मक सुधारणांचा पुढील टप्पा लवकरच जीएसटी परिषदेसमोर मांडला जाणार आहे. नागरिकांना दिलासा देणं, व्यवसायांना अधिक निश्चितता देणं आणि करदात्यांना सुलभ करप्रणाली उपलब्ध करून देणं हे या सुधारणांचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

****

दरम्यान, अमेरिका-भारत व्यापार करारावरील वाटाघाटी अजूनही सुरू असून त्याला अंतिम स्वरूप येणं बाकी असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत जर्मन नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. देशाला आपले मत व्यक्त करण्यासाठी वाटाघाटी हे एकमेव व्यासपीठ असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. सात ऑक्टोबर रोजी बैठकीतले निर्णय आणि नवीन रेपो दर जाहीर केला जाणार आहे.

****

औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.

****

मलेशियात पेनांग इथं सुरू असलेल्या आशिया-पॅसिफिक कर्णबधिरांच्या क्रीडा स्पर्धेत भारताने बुद्धिबळ ब्लिट्झ प्रकारात तीन पदकं पटकावली. महिलांच्या गटात कर्नाटकच्या श्रेया वाय. एस. हिने सुवर्णपदक, तर अंबिकाने रौप्यपदक पटकावलं. पुरुषांच्या गटात पश्चिम बंगालच्या १३ वर्षीय अंकित गांगुलीने कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या आता चार झाली आहे. यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासनाच्या वतीने काल नशा मुक्त युवा अभियान राबवण्यात आलं. आपल्या पाल्यांना व्यसनांपासून दुर ठेवण्यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं. युवक, युवतींसह विविध क्षेत्रातले नागरिकही या उपक्रमाला उपस्थित होते.

****

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मधल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment